मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला गेला आहे. अतिवृष्टी, पुर आणि अन्य नैसर्गिक अडचणींमुळे अनेक शेतकरी ई-पीक पाहणी वेळेत पूर्ण करू शकले नाहीत. त्यामुळे कृषी विभागाने शेतकरी स्तरावरील ई-पीक पाहणीसाठी दिलेली मुदत पुन्हा एकदा वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. आता शेतकऱ्यांना ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत ई-पीक पाहणी करता येणार आहे.
advertisement
शेतकऱ्यांना दिलासा
पूर्वी ही मुदत २० सप्टेंबर २०२५ पर्यंत होती. मात्र, क्षेत्रीय कार्यालयांकडून आलेल्या विनंतीनुसार सरकारने शेतकऱ्यांच्या सोयीसाठी आणखी १० दिवसांची मुदतवाढ दिली आहे. यामुळे अद्याप पिकांची नोंदणी न केलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. शेतकरी बांधवांनी या मुदतवाढीचा लाभ घ्यावा आणि आपली पाहणी तातडीने पूर्ण करावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
पाहणीसाठी आवश्यक सूचना
शेतकरी पिकाची नोंदणी करताना काही बाबींची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. रात्रीच्या वेळी पाहणी टाळावी, कारण अंधारामुळे फोटो स्पष्ट दिसत नाही. तसेच मोबाईलवरून फोटोवरून फोटो काढण्याऐवजी थेट शेतातील प्रत्यक्ष पिकाचा फोटो घ्यावा. अन्यथा नोंदणी प्रक्रियेत अडचणी निर्माण होऊ शकतात.
नवा बदल काय?
ई-पीक पाहणी प्रकल्पात यावर्षी एक महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. गेल्या उन्हाळी हंगामात शेतकरी ॲपद्वारे पिकाची नोंदणी करताना प्रत्यक्ष लागवड केलेल्या क्षेत्राच्या ५० मीटरच्या आतील फोटो स्वीकारले जात होते. मात्र, आता या नियमात सुधारणा करण्यात आली आहे. ही मर्यादा कमी करून २० मीटर करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी अपलोड केलेले फोटो अधिक अचूक आणि विश्वासार्ह ठरणार आहेत. यामुळे पिकाच्या नोंदीत पारदर्शकता वाढेल, चुकीच्या नोंदींना आळा बसेल आणि लाभ योजनांचा फायदा योग्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल.
तंत्रज्ञानाचा वापर वाढला
राज्यातील कृषी विभागाने गेल्या काही वर्षांत डिजिटल पद्धतींचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढवला आहे. त्याचा एक भाग म्हणून ई-पीक पाहणी प्रकल्प राबविण्यात आला आहे. मोबाईल ॲपच्या माध्यमातून शेतकरी स्वतःच आपल्या शेतातील पिकांची नोंदणी करू शकतात. या प्रणालीमुळे वेळेची बचत, मानवी चुका कमी होणे आणि आकडेवारीत पारदर्शकता येणे शक्य झाले आहे.
शेतकऱ्यांना आवाहन
ई-पीक पाहणी ही केवळ नोंदणीपुरती मर्यादित नसून शेतकऱ्यांना भविष्यातील शासकीय योजना, अनुदाने आणि विमा योजनेसाठी महत्त्वाची ठरते. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने आपली पाहणी वेळेत पूर्ण करणे गरजेचे आहे. विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे की, मुदत संपल्यानंतर नोंदणीसाठी अतिरिक्त वेळ दिला जाणार नाही.