TRENDING:

Nilesh Sable : बॉलिवूडच्या 'या' अभिनेत्यामुळे सुरू झाला होता निलेश साबळेचा 'चला हवा येऊ द्या' शो, कोण होता तो?

Last Updated:
Dr. Nilesh Sable Birthday : डॉ. निलेश साबळेचा आज वाढदिवस आहे. 'चला हवा येऊ द्या' कार्यक्रमाने मराठी टेलिव्हिजनवर कॉमेडी रिॲलिटी शोचा चेहराच बदलला.
advertisement
1/8
'या' बॉलिवूड अभिनेत्यामुळे सुरू झाला होता निलेश साबळेचा 'चला हवा येऊ द्या' शो
मुंबई: "कसे आहात सगळे? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न हसताय ना? हसलंच पाहिजे!" हे वाक्य आता केवळ वाक्य राहिलेलं नाही, तर एका हरहुन्नरी व्यक्तिमत्त्वाची ओळख बनलं आहे.
advertisement
2/8
अभिनेता, सूत्रसंचालक, कॉमेडियन, लेखक आणि दिग्दर्शक अशा अनेक भूमिका लीलया पेलणाऱ्या डॉ. निलेश साबळेचा (Dr. Nilesh Sable Birthday) आज, ३० जून रोजी वाढदिवस आहे.
advertisement
3/8
'चला हवा येऊ द्या' हा कार्यक्रम निलेश साबळेने आपल्या सूत्रसंचालनाच्या ताकदीने आणि सर्वच कलाकारांच्या जोरावर लोकप्रियतेच्या शिखरावर नेला. मात्र, या कार्यक्रमाबद्दल ही गोष्ट खूप कमी लोकांना माहित असेल.
advertisement
4/8
२०१४ साली 'झी मराठी'वर 'चला हवा येऊ द्या' हा कार्यक्रम सुरू झाला. या एका कार्यक्रमाने मराठी टेलिव्हिजनवरील कॉमेडी रिॲलिटी कार्यक्रमांचा चेहराच बदलला. निलेश साबळे, कुशल बद्रिके आणि भाऊ कदम यांनी आपल्या भन्नाट कॉमेडी टायमिंगच्या जोरावर पहिल्याच एपिसोडमध्ये प्रेक्षकांना जिंकून घेतलं. पण 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमाची खरी सुरुवात होण्याचं श्रेय एका बॉलिवूड अभिनेत्याला जातं. हा अभिनेता आहे महाराष्ट्राचा लाडका भाऊ अभिनेता रितेश देशमुख! निलेश साबळेने स्वतः काही मुलाखतींमध्ये हा रंजक किस्सा सांगितला आहे.
advertisement
5/8
मराठीतील डिजिटल प्लॅटफॉर्म असलेल्या 'भाडिपा'च्या 'रेडी टू लीड' कार्यक्रमात सारंग साठ्येने निलेशला विचारलं होतं की, 'हा शो सुरू करताना काही निश्चित होतं का? शो नेमका कसा सुरू झाला?' यावर उत्तर देताना निलेश म्हणाला, "माझ्या आयुष्यातील बऱ्याच गोष्टी अपघाताने घडल्या. 'फू बाई फू' त्यावेळी पाच वर्षं चालू होतं. त्यावेळी रितेश देशमुख यांचा 'लय भारी' हा सिनेमा आला होता. तेव्हा रितेश यांनी 'झी'कडे विचारणा केली होती की, हिंदीप्रमाणे आपल्याकडे एक-दीड तास प्रमोशन करता येईल असा मोठा प्लॅटफॉर्म आहे का? असा प्लॅटफॉर्म आपल्याकडे नव्हता. त्याच वेळी मला 'झी'मधून फोन आला की, त्यांची अशी इच्छा आहे की, 'लय भारी'च्या प्रमोशनसाठी असा एक एपिसोड करायचा आहे."
advertisement
6/8
निलेशने जेव्हा एपिसोड कधी करायचा आहे, असं विचारलं, तेव्हा चॅनेलकडून 'परवा' असं उत्तर आलं. एक संपूर्ण शो जवळपास १६-१७ तासांत उभा करणं निलेशला सुरुवातीला कठीण वाटलं होतं. पण 'झी' चॅनेलने 'लय भारी'च्या प्रमोशनसाठी निलेशवर विश्वास दाखवला. या संधीचं सोनं करण्यासाठी त्याने हा शो करण्याचं ठरवलं. 'चला हवा येऊ द्या'मध्ये काम करणाऱ्या सर्वांना निलेशने फोन केला, पण तेव्हा त्यांच्या तारखा उपलब्ध नव्हत्या. केवळ भाऊ कदम आणि कुशल बद्रिके यांचाच होकार निलेशला मिळाला.
advertisement
7/8
भाऊ-कुशलविषयी निलेश म्हणाला होता, "कुशल आणि भाऊ अशी माणसं आहेत की, 'तुझ्यासाठी कायपण आणि कधीपण!' रात्री १०-११ वाजता त्यांच्या घरी गेलो. त्याच्याच मुलाच्या शाळेच्या वहीची पानं फाडली आणि त्यावर २-३ पानांची स्क्रिप्ट लिहिली. ज्या गोष्टी आम्ही मेकअप रूममध्ये बोलायचो, त्यातून ही स्क्रिप्ट तयार झाली. त्यातून तीन तासाचं फुटेज तयार झालं, म्हणून आम्ही दोन एपिसोड करायचं ठरवलं. हे दोन्ही एपिसोड टेलिकास्ट झाल्यानंतर त्याचं रेटिंग आलं, चांगला प्रतिसाद मिळाला, तेव्हा ठरलं याचा आपण शो करायला हवा."
advertisement
8/8
अशाप्रकारे 'चला हवा येऊ द्या' या लोकप्रिय कार्यक्रमाची सुरुवात झाली. यातील कलाकारांनी परदेशातही शो केले आणि मराठीपासून हिंदीपर्यंत अनेक दिग्गजांनी या शोमध्ये उपस्थिती दर्शवली. या कार्यक्रमाच्या यशात डॉ. निलेश साबळे यांचा सिंहाचा वाटा आहे, यात शंका नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Nilesh Sable : बॉलिवूडच्या 'या' अभिनेत्यामुळे सुरू झाला होता निलेश साबळेचा 'चला हवा येऊ द्या' शो, कोण होता तो?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल