Weather Alert: जानेवारीत पुन्हा हवा बिघडली, थंडी, पाऊस नव्हे आता वेगळाच अलर्ट
- Reported by:Namita Suryavanshi
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Weather Alert: जानेवारीच्या सुरुवातीलाच हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. हवामान विभागाने 6 जानेवारीसाठी अलर्ट दिला आहे.
advertisement
1/5

राज्यात नव्या वर्षात सातत्याने हवामानात बदल होत आहेत. थंडीचा कडाका सुरू असतानाच जानेवारीच्या पहिल्याच दिवशी अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यानंतर आता पुन्हा हवापालट झाली असून आता थंडीपेक्षा वेगळंच संकट घोंघावत आहे. राज्यातील बहुतांश भागातून उत्तर भारतातील शीतलहरींचा जोर ओसरला असून तापमानात वाढ झालीये. आज 6 जानेवारी रोजी मुंबई पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात हवामान कसं असणार आहे याबद्दल जाणून घेऊ.
advertisement
2/5
मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर, रायगड आणि रत्नागिरीसह संपूर्ण कोकण किनारपट्टीत आज हवामान स्थिर आणि कोरडे राहणार आहे. मुंबईत पावसाची कोणतीही चिन्हे नसून आकाश स्वच्छ राहण्याची शक्यता आहे. कमाल तापमान सुमारे 30 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचू शकते, तर किमान तापमान 18 ते 20 अंश सेल्सिअसच्या आसपास राहील. ठाणे, नवी मुंबई आणि पालघर भागातही अशीच स्थिती राहणार असून, सकाळी सौम्य गारवा तर दुपारनंतर उष्णता जाणवेल. दरम्यान, अलीकडे झालेल्या अचानक पावसाच्या घटनांमुळे मुंबईतील हवेच्या गुणवत्तेत बदल झाला असून, काही भागांत हवा तुलनेने अधिक प्रदूषित झाल्याचे दिसून येत आहे.
advertisement
3/5
पुणे शहर आणि परिसरात थंडीचा प्रभाव कमी झाला आहे. शहरात कमाल तापमान सुमारे 30 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 15 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. पहाटेच्या वेळी धुके दिसून येऊ शकते, मात्र दिवसभर हवामान कोरडे राहील. पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातही सकाळी गारवा जाणवेल, तर दुपारनंतर तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे.
advertisement
4/5
मराठवाडा विभागात आकाश बहुतांश वेळा निरभ्र राहणार आहे. छत्रपती संभाजीनगर येथे कमाल तापमान सुमारे 30 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 13 अंश सेल्सिअस राहील. किमान तापमानात झालेल्या वाढीमुळे मराठवाड्यात थंडीचा कडाका कमी झाला आहे. विदर्भातील काही भागांत सकाळी धुक्याची स्थिती राहणार असून, नागपूरमध्ये कमाल तापमान 27 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 13 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांतही थंडीचा प्रभाव कमी झाल्याचे जाणवत आहे.
advertisement
5/5
दरम्यान, पुढील काही दिवस राज्यात हवामान मोठ्या प्रमाणात बदलण्याची शक्यता नाही. थंडी पूर्णपणे ओसरलेली नसली तरी तिची तीव्रता कमी राहणार आहे. पहाटे आणि रात्री गारवा जाणवत राहील, तर दिवसा तापमानात वाढ होत राहण्याचा अंदाज आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मुंबई/
Weather Alert: जानेवारीत पुन्हा हवा बिघडली, थंडी, पाऊस नव्हे आता वेगळाच अलर्ट