Maha Shivratri 2025: 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक त्र्यंबकेश्वर, कधी आणि कोणी बांधले? पाहा मंदिराचा इतिहास
- Published by:Mohan Najan
- Reported by:Kunal Santosh Dandgaval
Last Updated:
Maha Shivratri 2025: त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग हे भारतातील एक प्राचीन तीर्थस्थान आहे. सर्व 12 ज्योतिर्लिंगांपैकी हे विशेष आहे.
advertisement
1/7

त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग हे भारतातील एक प्राचीन तीर्थस्थान आहे. सर्व 12 ज्योतिर्लिंगांपैकी हे विशेष आहे. हे स्वयंभू मंदिर नाशिक शहरापासून 28 किमी अंतरावर सह्याद्री पर्वताच्या पायथ्याशी वसलेल्या त्र्यंबकेश्वर तालुक्यात स्थित आहे. पवित्र गंगा गोदावरी नदीचे उगमस्थान त्र्यंबकेश्वराच्या जवळ आहे. मंदिर प्रांगणाच्या जवळच कुशावर्त तीर्थ आहे. श्री ज्ञानेश्वर माऊलींचे बंधू श्री निवृत्ती महाराजांची समाधी देखील त्र्यंबकेश्वर मध्येच आहे. त्र्यंबकेश्वरमध्ये अनेक धार्मिक संस्था देखील आहेत ज्या वेदशाळा, संस्कृत पाठशाळा, कीर्तन पाठशाळा, प्रवचन संस्था चालवितात.
advertisement
2/7
पौराणिक संदर्भानुसार असे सांगितले जाते की, ब्रह्मदेवांनी इथे एका पर्वतावर श्री महादेवांना प्रसन्न करण्यासाठी तप केले जे पुढील काळात ब्रह्मगिरी पर्वत नावाने विख्यात झाले. या पर्वतावर एकेकाळी गौतम ऋषींचा आश्रम होता. गोहत्या पातकातून मुक्तता मिळावी म्हणून त्यांनी कठोर तपश्चर्या केली आणि महादेवांना प्रसन्न केले. गौतम ऋषींच्या विनंतीवरून महादेव इथे त्रिमूर्ती होऊन ज्योतिर्लिंग स्वरूपात विराजमान झाले.
advertisement
3/7
तेव्हापासून हे स्थान त्र्यंबकेश्वर म्हणून ओळखले जाऊ लागले. ज्योतिर्लिंग हा शब्द प्रकाशस्तंभला दर्शवतो. त्र्यंबकेश्वर शिवलिंगाची वास्तविक रचना इतर 11 ज्योतिर्लिंगांपेक्षा वेगळी आहे, कारण त्र्यंबकेश्वर येथे शिवपिंडी मध्ये अंगठ्याच्या आकाराच्या तीन कपार आहेत ज्यात त्रिमूर्ती म्हणजेच ब्रह्मा-विष्णु-महेश विद्यमान आहेत. या शिवलिंगातून गोदावरीचा प्रवाह सातत्याने सुरू असतो. या स्वरूपाचे हे जगात एकमेव शिवलिंग आहे. आणखी ह्या मंदिराची विशेषता अशी आहे की ज्योतिर्लिंगावर त्रिकाल पूजा केली जाते जी स्थानिक माहितीप्रमाणे 350 वर्षांपासून चालू आहे, जी द्वादश ज्योतिर्लिंगांपैकी केवळ त्र्यंबकेश्वर मंदिरातच होते.
advertisement
4/7
हे महादेव मंदिर 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. त्र्यंबकेश्वर मंदिराची गणना हिंदू धर्मातील सर्वात पवित्र स्थानांमध्ये केली जाते. हे शिवभक्तांचे प्रमुख तीर्थक्षेत्र आहे. हे पौराणिक मंदिर महाराष्ट्रातील नाशिक विमानतळापासून 30 किलोमीटर अंतरावर आहे. या गावाचे नाव त्र्यंबक. येथेच गंगा नदी गोदावरीच्या रूपाने पृथ्वीवर आल्याची कथाही सांगितली आहे. येथे ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिगुणांचा अवतार असल्याचे म्हटले जाते.
advertisement
5/7
मुघलांच्या हल्ल्यानंतर पेशव्यांनी या मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम केले. बाळाजी म्हणजेच श्रीमंत नानासाहेब पेशवे, जे तिसरे पेशवे म्हणून प्रसिद्ध आहेत, त्यांनी 1755 ते 1576 दरम्यान या मंदिरांची पुनर्रचना केली.असे म्हटले जाते की सोने आणि मौल्यवान दगडांनी बनवलेला लिंगावरील मुकुट पांडवांनी दान केला होता. सतराव्या शतकात या मंदिराचा जीर्णोद्धार सुरू असताना या कामासाठी 16 लाख रुपये खर्च झाल्याचे सांगितले जाते. त्र्यंबक ही गौतम ऋषींची तपोभूमी म्हणूनही ओळखले जाते.
advertisement
6/7
त्र्यंबकेश्वर मंदिर काळ्या दगडांवरील कोरीव काम आणि त्याची भव्यता यासाठी जगभर प्रसिद्ध आहे. संपूर्ण मंदिर काळ्या दगडांनी बनलेले आहे. चौकोनी मंडप आणि मोठे दरवाजे हे मंदिराचे वैभव आहे. मंदिराच्या आत एक सोन्याचा कलश आहे आणि शिवलिंगाजवळ हिरे आणि इतर मौल्यवान रत्नांनी जडलेले मुकुट ठेवलेले आहेत. या सर्वांचे पौराणिक महत्त्व आहे.मुघल काळातील राज्यकर्त्यांनी भारतातील अनेक शहरांतील हिंदू देवतांची देवस्थाने नष्ट केली होती, त्यापैकी एक नाशिकमधील त्र्यंबकेश्वर मंदिर होते. इतिहासकार जदुनाथ सरकार यांनी त्यांच्या हिस्ट्री ऑफ औरंगजेब या पुस्तकात याचा उल्लेख केला आहे.
advertisement
7/7
त्यांनी लिहिले आहे की, 1690 मध्ये मुघल शासक औरंगजेबाच्या सैन्याने नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरातील शिवलिंग तोडले. मंदिराचेही मोठे नुकसान झाले. आणि त्यावर मशिदीचा घुमट बनवला होता. औरंगजेबानेही नाशिकचे नावही बदलले होते. पण 1751 मध्ये मराठ्यांनी पुन्हा नाशिक काबीज केले, त्यानंतर हे मंदिर पुन्हा बांधण्यात आले.तसेच महाशिवरात्री निमित्त त्र्यंबकेश्वर मंदिरात रोषणाई करण्यात आली आहे. अनेक भाविक भक्त त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेण्यासाठी ह्या ठिकाणी मोठी गर्दी करत असतात. तसेच यंदा भाविकांना शिवपिंडीचे दर्शन घेण्यासाठी मंदिर हे 24 तास खुले ठेवण्यात येणार आहे. तसेच शिवरात्री निमित्त आजपासून मंदिरात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/Temples/
Maha Shivratri 2025: 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक त्र्यंबकेश्वर, कधी आणि कोणी बांधले? पाहा मंदिराचा इतिहास