राज्यातील महायुती सरकारमधील तिन्ही घटक पक्षांमध्ये कुरघोडीचे राजकारण सुरू असल्याची चर्चा आहे. विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात भाजप आमदारांनी शिंदेच्या मंत्र्यांना घेरण्याचा प्रयत्न केला. तर, दुसरीकडे शिंदे गटाचे आमदार, मंत्री हाणमारी, पैशांची बॅग अशा विविध कारणांनी चर्चेत आले. विरोधक या मुद्यावरून आक्रमक झाले होते. तर, दुसरीकडे मुख्यमंत्र्यांनी सभागृहात उद्धव ठाकरेंना सत्तेत येण्याची ऑफर दिली होती. त्यानंतर शनिवारी मुख्यमंत्री फडणवीस आणि आदित्य ठाकरे यांची वांद्रेतील हॉटेलमध्ये चर्चा झाल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर राजकीय वर्तुळात उधाण आले. या भेटीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी अनौपचारिकपणे भाष्य केले.
advertisement
काय म्हणाले आदित्य ठाकरे?
ठाकरे गटाचे नेते, आमदार आदित्य ठाकरे यांनी म्हटले की, आमच्या भेटीच्या बातम्या ऐकतोय. आता या भेटीच्या बातम्या बघून एक व्यक्ती गावी जाईल, चाललंय ते चालू द्या, असं आदित्य यांनी म्हटल्याची माहिती सूत्रांनी दिली. आदित्य यांनी या भेटीच्या चर्चांवरून एकनाथ शिंदे यांनाच टोला लगावल्याचे म्हटले जात आहे.
मुख्यमंत्री फडणवीस आणि ठाकरेंची भेट?
समोर आलेल्या माहितीनुसार, आदित्य ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघेही वांद्रेतील हॉटेलमध्ये होते. मात्र, दोघांची भेट झाली नसल्याची माहिती आहे. आदित्य ठाकरे हे आपल्या एका खासगी पूर्वनियोजित कार्यक्रमासाठी तिथे गेले होते. यावेळी त्यांचे काही मित्रमंडळीदेखील होते. मात्र, त्यांची आणि मुख्यमंत्र्यांची भेट झाली नाही.