लालू प्रसाद यादव यांचा हा दावा भाजपने मात्र फेटाळून लावला आहे. लालू यादवना मतीभ्रम होत आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात लोकांनी विश्वासाला पुष्टी दिली आहे, अशी प्रतिक्रिया भाजपने दिली आहे.
पक्षाच्या कार्यकर्त्यांसोबत बोलताना लालू यादव यांनी कोणत्याही परिस्थितीसाठी तयार राहा, असं सांगितलं आहे. मागच्या बऱ्याच काळापासून बिहार विधानसभेत आम्ही सगळ्यात मोठा पक्ष आहोत. इतर पक्षांप्रमाणे आम्ही कधीच विचारधारेसोबत समझौता केला नाही, असं लालू प्रसाद यादव म्हणाले.
advertisement
एनडीएचे बहुतेक नेते भाजपच्या एका कार्यक्रमात सहभागी झाले होते, जिकडे बिहारमधल्या नवनियुक्त केंद्रीय मंत्र्यांचा सत्कार केला जात होता, तेव्हा लालूंनी ही भविष्यवाणी केली आहे. बिहारमधले भाजप नेते नित्यानंद राय यांनी लालूंच्या या वक्तव्यावर पलटवार केला आहे. 'लालू मुंगेरी लाल के हसीन सपने पाहत आहेत. लोकांनी मोदींना मत दिलं आहे, ते आता रेकॉर्ड तिसऱ्यांदा सत्तेत आहेत. मोदींचं नेतृत्व आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली बिहारमध्ये एनडीए विरोधकांना पराभूत करेल', असं नित्यानंद राय म्हणाले आहेत.