अमनसिंग हा 29 डिसेंबरला सकाळी त्याची सुझुकी ऍक्सेस ही दुचाकी घेऊन घरातून बाहेर पडला. कामावर जात असल्याचं सांगून तो गेला पण रात्री उशीर झाला तरीही अमनसिंग घरी आला नाही, तसंच त्याचा फोनही स्विच ऑफ येत होता, त्यामुळे अमनच्या कुटुंबाने त्याचा शोध घ्यायला सुरूवात केली. अखेर अमन कुठेच सापडत नसल्यामुळे कुटुंबाने पोलीस स्टेशनला धाव घेतली. अमनची आई अनिता सुरेंद्रसिंग गचंड यांनी मुलगा हरवल्याची तक्रार पोलीस स्टेशनला दिली.
advertisement
तक्रार प्राप्त होताच पोलिसांनी तांत्रिक तपास सुरू केला, यात अमनसिंगचं शेवटचं लोकेशन लोणावळा भागात आलं, त्यामुळे पोलिसांनी लोणावळा आणि खोपोलीच्या पोलिसांसोबत संपर्क साधला. यानंतर खोपोली पोलिसांनी लोणावळा आणि खंडाळा घाट पिंजून काढला, पण त्यांना अमनसिंगबद्दल काहीही सुगावा मिळाला नाही. अखेर 9 दिवसांनंतर अमनसिंग याचा मृतदेह खेड शिवापूर भागात सापडला.
अमनसिंगचा मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांनी त्याच्या मोबाईलचा सीडीआर तपासला, ज्यातून पोलिसांना धागेदोरे सापडले. यानंतर पोलिसांनी उत्तमनगरचे रहिवासी असलेल्या प्रथमेश चिदू आढळ (वय 19) आणि नागेश बालाजी धबाले (वय 19) यांना अटक केली, तसंच त्यांच्यासोबत असलेल्या दोन अल्पवयीन मुलांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं.
या चौघांनीही जुन्या वादातून अमनसिंगचं अपहरण केल्याची माहिती समोर आली आहे. अमनसिंगची हत्या केल्यानंतर चारही आरोपी बेळगावला पळून गेले होते. पोलिसांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी बेळगाव गाठलं आणि प्रथमेश आढळ, नागेश धबाले आणि दोन्ही अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतलं. या चौघांनीही अमनसिंगचं अपहरण करून त्याच्यावर दगड आणि कोयत्याने वार करून हत्या केल्याचं कबूल केलं आहे.
