आकाश जाधव आणि मयूर जाधव असं अपघातात मृत पावलेल्या चुलत भावांची नावं आहेत. या दोघांपैकी आकाशचा आज वाढदिवस होता. हे दोघे चुलत भाऊ सोमवारी सायंकाळच्या सुमारास मंचरवरून दुचाकीने आपल्या घरी अवसरी खुर्द येथे जात होते. घरी जात असताना दोघांवर काळाने घाला घातला.
मिळालेल्या माहितीनुसार, दोघंही अवसरी खुर्द गावच्या हद्दीत आले असता, डिंभे उजवा कालवा चारीजवळ त्यांच्या दुचाकीवरील नियंत्रण सुटले. त्यांची दुचाकी वेगाने पुलाच्या कठड्याला धडकली आणि या धडकेमुळे दोघेही तरुण खाली कालव्याच्या चारीमध्ये कोसळले. हा अपघात इतका भीषण होता की, यात आकाश आणि मयूर या दोघांचाही जागीच मृत्यू झाला.
advertisement
या अपघाताची माहिती मिळताच परिसरात शोककळा पसरली आहे. वाढदिवसाच्या दिवशीच दोन तरुणांचा दुर्दैवी अपघाती मृत्यू झाल्यामुळे जाधव कुटुंबावर आणि अवसरी खुर्द गावावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मंचर पोलिसांनी या घटनेची नोंद घेऊन पुढील तपास सुरू केला आहे.