पुणे : पुण्यात डंपरने मोटारीला धडक दिल्याने पिता-पुत्राचा मृत्यू झाला आहे. भरधाव डंपरने मोटारीला धडक दिल्यामुळे पिता-पुत्राचा मृत्यू झाल्याची घटना सोलापूर महामार्गावरील थेऊर फाट्याजवळ गणेशवाडी परिसरात घडली. या प्रकरणी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात डंपरचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकाच दिवशी डंपरने धडक दिल्याने झालेला हा दुसरा अपघात आहे. चंदननगर खराडी परिसरात डंपरच्या धडकेत तरुणीचा मृत्यू झाला होता. दुचाकी डंपरच्या चाकाखाली गेल्यानं चिरडून तरुणी जागीच मृत्यूमुखी पडली होती.
advertisement
मिळालेली माहिती अशी की, अभिजित सोमवारी दुपारी कुटुंबीयांसह कोलवडी ते थेऊर फाटा रस्त्याने मोटारीतून निघाले होते. त्यावेळी भरधाव डंपरने त्यांच्या मोटारीला धडक दिली.या अपघातात मोटारीतील अभिजित आणि वडील सुरेश पवार यांच्या डोक्यास गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी फिर्यादीवरून डंपरचालक संदेश लक्ष्मणराव पवार (वय ३३, रा. वाघोली) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.अपघातानंतर डंपरचालक पसार झाला आहे.
अपघातात अभिजित सुरेश पवार (वय ३६) आणि सुरेश प्रभाकर पवार (वय ६२, दोघे रा. ट्रिनिटी सोसायटी, बकोरी फाटा, वाघोली) अशी मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. तर अभिजित यांची पत्नी प्रणिता पवार, पुतण्या रियांश पवार आणि आई सुलोचना पवार हे गंभीर जखमी झाले आहेत. अन्य जखमींना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
चंदननगर, खराडी परिसरात हा अपघात झाला आहे. या अपघातामुळे डंपरचालकांकडून बेदरकारपणे वाहने चालवून इतरांच्या जीवाला निर्माण होणाऱ्या धोक्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. महिन्याभरापूर्वी सुद्धा असाच अपघात या परिसरात झाला होता.
