एक रुपयाचाही व्यवहार झाला नाही - अजित पवार
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना पुण्यातील मुंढवा येथील जमीन खरेदी प्रकरणात एक रुपयाचाही व्यवहार झाला नाही. आता हा संपूर्ण व्यवहारच रद्दबातल करण्यात आला आहे, असं अजित पवार म्हणाले होते. त्यावर आता अंबादास दानवे यांनी अजित पवारांच्या वक्तव्याचा समाचार घेतला.
advertisement
अजित पवारांवर दानवेंचं टीकास्त्र
अजित पवार म्हणतात की व्यवहार झालाच नाही. असं असेल तर मग तो रद्द करण्याची वेळ कशी आली. अजित दादांचे या विषयाचे वक्तव्य म्हणजे 'जोक ऑफ द डे' आहे, असं म्हणत अंबादास दानवे यांनी अजित पवार यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. तसेच दानवे यांनी यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका देखील केल्याचं म्हटलं आहे.
भ्रष्टाचाराला दिलेला हा राजश्रय - अंबादास दानवे
इतर वेळी मुद्देसूद विषय मांडणारे, नियमांवर बोट ठेवणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ही 'बेसंबंध' वाक्य सहनही होतात. एका अर्थाने संघाच्या मुशीत तयार झालेल्या नेत्याने भ्रष्टाचाराला दिलेला हा राजश्रय म्हणावा लागेल, असं म्हणत दानवे यांनी फडणवीसांना टोला लगावला. डबल इंजिन की सरकार, भ्रष्टाचार करेंगे धुवांधार, असं म्हणत अंबादास दानवे यांनी सरकारवर टीका केली आहे.
पार्थ पवारांवर गुन्हा दाखल होईल का?
दरम्यान, नोंदणी कशी झाली हा चौकशीचा भाग आहे. यासाठीच्या समितीने दबावाला बळी न पडता चौकशी करावी, यातून वस्तुस्थिती समोर येईल. मी किंवा माझ्या नातेवाईकांशी संबंधित कुठलीही प्रकरणे असली तरी संबंधित अधिकाऱ्यांनी रीतसर चौकशी करावी, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता पार्थ पवार यांच्यावर गुन्हा दाखल होईल का? असा सवाल विचारला जात आहे.
