नेमकी घटना काय?
महेश डामसे असं मृत आढळलेल्या तरुणाचं नाव आहे. त्याचं त्याच्याच गावातील एका तरुणीवर एकतर्फी प्रेम होतं. त्याने तिच्याकडे लग्नासाठी विचारणा केली होती. परंतु तरुणीने लग्नाला स्पष्ट नकार दिला होता. या नकाराचा राग महेशच्या मनात धुमसत होता. याच रागातून त्याने तरुणीवर हल्ला करण्याचा कट रचला.
बुधवारी सकाळी ही तरुणी जुन्नरमधील आदिवासी मुलींच्या शासकीय वस्तीगृहातून महाविद्यालयाकडे जाण्यासाठी निघाली होती. वस्तीगृहाच्या बाहेरच दबा धरून बसलेल्या महेशने तिला गाठले आणि काही कळण्याच्या आत आपल्याजवळील तीक्ष्ण कोयत्याने तिच्या डोक्यावर आणि चेहऱ्यावर सपासप वार केले. या भीषण हल्ल्यात तरुणी रक्ताच्या थारोळ्यात पडली आणि गंभीर जखमी झाली.
advertisement
गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह
हल्ला केल्यानंतर महेश घटनास्थळावरून फरार झाला होता. जुन्नर पोलिसांनी तातडीने त्याचा शोध सुरू केला. दरम्यान, आज सकाळी एका टेकडीवर महेशची दुचाकी पोलिसांना आढळून आली. परिसराची अधिक पाहणी केली असता, जवळच असलेल्या एका झाडाला महेशने गळफास घेतलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह पोलिसांना सापडला. हल्ल्यानंतर अटकेच्या भीतीने किंवा पश्चातापातून त्याने हे टोकाचे पाऊल उचलले असावे, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.
एकतर्फी प्रेमाचा रक्तरंजित शेवट
एकतर्फी प्रेमातून घडलेल्या या रक्तरंजित घटनेमुळे जुन्नर तालुका हादरून गेला आहे. गंभीर जखमी तरुणीवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असून तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. भरदिवसा तरुणीवर झालेल्या या हल्ल्यामुळे आणि त्यानंतर आरोपीचा मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
