पुणे : पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याच्या कार्यालयात शिरुन मारहाण करण्याचा प्रयत्न झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुण्यातील महर्षीनगरमध्ये हा प्रकार घडला आहे. या प्रकरणी तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना CCTV मध्ये कैद करण्यात आली आहे.
समोर आलेल्या प्राथमिक माहितीनुसार, माहिती अधिकार सेलचे पुणे शहरची जबाबदारी असलेल्या पदाधिकाऱ्याला मारहाण करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. दिनेश पंडित खराडे यांनी याबाबत स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून आता तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
advertisement
त्या रात्री नेमकं काय घडलं?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा सगळा प्रकार ५ नोव्हेंबर रोजी रात्री १० वाजता घडला. दिनेश खराडे बांधकाम व्यावसायिक आहेत. त्यांच्याकडे सध्या माहिती अधिकार सेलचे पुणे शहर ची जबाबदारी आहे. महर्षीनगर परिसरात त्यांचे कार्यालय आहे. ५ नोव्हेंबर रोजी ते कार्यालयात असताना रात्री १० वाजण्याच्या सुमारास एक तरुण त्यांच्या कार्यालयात शिरला. त्याच्या हातामध्ये लाकडी बांबू होता.
मारहाणीचे कारण अद्याप समोर नाही
कार्यालयात सर्व जण बेसावध असताना त्याने अचानक त्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला. पळून जात असताना कार्यालयाचा बाहेर एका दुचाकीवर दोन जण थांबले होते. त्यांच्या मागे बसून तो व्यक्ती पळून गेला. तो नेमका कोण होता, कशासाठी त्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला, याचं कारण समजू शकलेले नाही.
पुण्याची गुन्हेगारी चर्चेचा विषय
पुण्यातील गुन्हेगारी आता राज्यात चर्चेचा विषय ठरली आहे. ड्रग्जची तस्करी, कोयता गँगची दहशत ते दिवसाढवळ्या हत्यांच्या सत्रामुळे कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा उडालाय. अनेक गुन्ह्यांमध्ये अल्पवयीन मुले असल्याचं तपासातून समोर आलंय. आंदेकर-कोमकर टोळी युद्धात ज्या हत्या झाल्यात त्यामध्ये अल्पवयीन तरुणांचा समावेश आहे. . राज्याची सांस्कृतिक राजधानी, सायबर सिटी असलेल्या पुणे शहराला लागलेली गुन्हेगारीची किड आता अनेकांचं आयुष्य उद्धव्स्त करतेय. त्यामुळे याचा समूळ नायनाट करण्याचं आव्हान पुणे पोलिसांसमोर आहे.