गेल्या दहा वर्षांपासून गणेश पेठ येथील मच्छी मार्केट मधील व्यापाऱ्यांकडून बंडू आंदेकरने तब्बल 20 कोटीहून अधिक रकमेची खंडणी उकळल्याचे पोलिसांच्या तपासात उघडकीस आले आहे. आंदेकर कुटुंबातील सहा जणांविरुद्ध या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व्यापाऱ्यांमध्ये दहशत माजवून बंडू आंदेकर, कृष्णा आंदेकर, शिवम आंदेकर , अभिषेक उदयकांत आंदेकर , सोनाली वनराज आंदेकर आणि शिवराज उदयकांत आंदेकर यांनी दरमहा 15 ते 20 लाख रु खंडणी उकळल्याचे निष्पन्न झाले आहे.
advertisement
नाना पेठेत मोठी कारवाई
पुण्यातील गुन्हेगारी टोळ्या संपवण्यासाठी पोलिसांनी आंदेकर टोळीवर सर्वात मोठी कारवाई करायला सुरुवात केली आहे. पुण्याच्या नाना पेठेत आंदेकर टोळीकडून मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम केलं होतं. हेच बांधकाम आता तोडायला सुरुवात केली आहे. या पाडकामासाठी पुणे महानगरपालिका आणि पुणे पोलिसांचं पथकाने नाना पेठेत संयुक्तपणे ही कारवाई केली.
पुण्यातील गँगवॉरला चाप बसणार?
नाना पेठेत ज्या ठिकाणी वनराज आंदेकरची हत्या झाली होती. त्याठिकाणी आंदेकर टोळीने वनराजचं मोठं बॅनर लावलं होतं. तसेच या परिसरात अनधिकृत बांधकाम देखील केलं होतं. पण याठिकाणी आंदेकर टोळीची प्रचंड दहशत असल्याने त्यांच्यावर कसलीही कारवाई करण्यात येत नव्हती. तिकडे जायलाही प्रशासन घाबरत होतं. मात्र आता हेच अनधिकृत बांधकाम पाडायला सुरुवात केली आहे. आंदेकर टोळी तुरुंगात असताना त्यांच्या आर्थिक नाड्या आवळल्याने पुण्यातील गँगवॉरला चाप बसणार? असा प्रश्नही आता उपस्थित होत आहे.