काय आहे या टोळीची पद्धत?
मिळालेल्या माहितीनुसार, ही टोळी प्रामुख्याने आलिशान आणि महागड्या कारला आपले लक्ष्य बनवते. टोळीतील तरुण दुचाकीवरून येतात आणि मुद्दाम कारला हलकासा कट मारतात किंवा गाडी घासून नेतात. गाडी थांबताच, "माझ्या गाडीचे मोठे नुकसान झाले आहे, माझा पाय मोडला आहे," असा आरडाओरडा सुरू केला जातो. काही वेळातच टोळीतील इतर साथीदार तिथे जमा होतात आणि कारचालकाला घेरून त्याच्यावर मानसिक दडपण आणतात. प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत न नेण्यासाठी आणि वाद मिटवण्यासाठी काही हजार रुपयांची मागणी केली जाते.
advertisement
डॅश कॅममुळे प्रकार उघड
नुकत्याच समोर आलेल्या एका घटनेत, एका कारचालकाने ही फसवणूक वेळीच ओळखली. जेव्हा दुचाकीस्वाराने गोंधळ घालण्यास सुरुवात केली, तेव्हा चालकाने आपल्या कारमध्ये डॅश कॅम असल्याचे सांगितले. कॅमेरा असल्याचे कळताच, खंडणी उकळणाऱ्या भामट्यांनी तिथून काढता पाय घेतला. डॅश कॅममधील फुटेजमध्ये स्पष्ट दिसत आहे की, दुचाकीस्वाराने स्वतःहून कारला कट मारला होता.
वाकड पोलिसांनी या व्हिडिओची दखल घेतली असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे या संशयित टोळीचा शोध सुरू केला आहे. मात्र वाहनचालकांनी आपल्या वाहनात डॅश कॅम बसवा, जो संकटाच्या वेळी मोठा पुरावा ठरू शकतो. असा कोणताही संशयास्पद अपघात झाल्यास घाबरून त्वरित पैसे देऊ नका. तात्काळ ११२ क्रमांकावर फोन करा किंवा समोरच्या व्यक्तीला पोलीस चौकीत सोबत येण्यास सांगा. भामटे सहसा पोलिसांचे नाव ऐकताच पळ काढतात.
