रविवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास पुण्याहून नाशिककडे जाणाऱ्या एका कंटेनरवर रेल्वेची बोगी दिसली. हे दृश्य एका नागरिकाने य मोबाईल कॅमेऱ्यात टिपले आणि सोशल मीडियावर शेअर केले. काही मिनिटांतच हे छायाचित्र व्हायरल झाले. लोकांमध्ये लगेचच चर्चा सुरू झाली की अखेर पुणे-नाशिक रेल्वे लवकरच धावणार का? हा प्रकल्प प्रत्यक्षात साकार होण्याच्या उंबरठ्यावर आहे का?
advertisement
अनेकांना या छायाचित्रामुळे पुन्हा एकदा आशा वाटू लागली. मात्र प्रशासनाकडून याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे हा प्रकल्प अजूनही गूढच असल्याचे नागरिक मानत आहेत.
खरं तर पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्पाला सुरुवातीपासूनच आर्थिक, प्रशासकीय आणि तांत्रिक अडथळे येत राहिले आहेत. त्यामुळे अनेक वेळा प्रकल्प पुढे ढकलला गेला. पायाभूत सुविधा, खर्चाचा अंदाज आणि मार्गातील अडचणी यामुळे कामाला योग्य वेग मिळू शकला नाही. तरीही जेव्हा अशा बोगी वाहतुकीची छायाचित्रे किंवा व्हिडिओ सोशल मीडियावर येतात. तेव्हा लोकांमध्ये पुन्हा उत्सुकता निर्माण होते.
याआधीही अशाच प्रकारे नाशिक जिल्ह्यातील एकलहरे परिसरात रेल्वेची बोगी कंटेनरवरून जाताना दिसली होती. आजही लोकांच्या मनात तोच प्रश्न आहे पुणे-नाशिक रेल्वे खरोखर सुरू होणार का? की ही फक्त घोषणांपुरतीच राहणार आहे. सरकारने यावर अंतिम निर्णय घेऊन ठोस कृती आराखडा जाहीर केल्याशिवाय या प्रकल्पाबद्दलची संभ्रमावस्था कायम राहणार आहे.
जोपर्यंत रेल्वेचा प्रत्यक्ष धावता रुळांवर दिसत नाही, तोपर्यंत पुणे-नाशिक रेल्वे लोकांसाठी केवळ एक अपूर्ण स्वप्नच ठरणार आहे. मात्र सोशल मीडियावरील प्रत्येक नव्या चर्चेमुळे या प्रकल्पाबद्दलची आशा पुन्हा पेट घेत राहते.