नाना पेठेतील चौकात वनराज आंदेकर यांच्यावर रविवारी रात्री गोळीबार करण्यात आला. त्यानंतर कोयत्याने वार केले. हे वार वर्मी लागून वनराज आंदेकर यांचा मृत्यू झाला. जेव्हा हल्ला केला जात होता तेव्हा तिथेच गॅलरीत वनराज यांची बहीण संजीवनी थांबली होती. तिने हल्लेखोरांना चिथावणी देत, “मारा मारा, दोघांना सोडू नका” असे ओरडून सांगितल्याचं तक्रारीत म्हटलं आहे.
advertisement
पोलीस ठाण्यात दिली होती धमकी
वनराज आंदेकरांच्या हत्येआधी पोलीस ठाण्यात वनराज यांची बहीण संजीवनी आणि जयंत कोमकर गेले होते. आकाश परदेशी याच्याशी वादानंतर तक्रार देण्यासाठी संजीवनी आणि जयंत कोमकर पोलीस ठाण्यात गेले असताना तिथं वनराज आंदेकर पोहोचले होते. त्यावेळी आकाश परदेशी आणि जयंत कोमकर यांच्यातला वाद वनराज यांनी मिटवण्याचा प्रयत्न केला. पण तेव्हा बहीण संजीवनीने वनराज यांनाच जीवे मारण्याची धमकी दिली. “वनराज तुला आज पोरं बोलावून ठोकतेच” अशा शब्दांत संजीवनी कोमकर यांनी धमकी दिल्याचे वनराज यांच्या वडिलांनी तक्रारीत म्हटले आहे.
आरोपींना 9 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी
वनराज आंदेकर याच्या खून प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून त्यांना 9 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. 15 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. इतर आरोपींचा पोलीस शोध घेत आहे. आरोपींना 14 दिवसांची पोलीस कोठडी देण्याची मागणी पोलिसांनी केली होती. गोळीबार आणि कोयत्याने वार करून खून केल्या प्रकरणी आरोपी जयंत कोमकर आणि त्याचा भाऊ गणेश कोमकर यांना अटक केल्यानंतर न्यायालयात हजर करण्यात आले होते.