काय आहे प्रकरण?
अटकेत असलेले आरोपी खुशीलाल सहाणी (वय २१), राजेश सहाणी (वय ३५, दोन्ही रा. उत्तर प्रदेश) आणि मीर हसन अली (वय २८, रा. बिहार) यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम खात्यावरून आक्षेपार्ह मजकूर प्रसारित केला होता. या पोस्टमुळे दोन समाजात तणाव निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली होती. दौंड पोलिसांनी या प्रकरणाची तातडीने दखल घेत आरोपींना बेड्या ठोकल्या.
advertisement
दौंड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गोपाळ पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, या पोस्टमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकला असता. मात्र, दौंड पोलिसांनी वेळीच सतर्कतेचे पाऊल उचलले. समाजात शांतता आणि सलोखा टिकून राहावा यासाठी आरोपींना विशेष कार्यकारी दंडाधिकारी आणि बारामती विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक यांच्यासमोर हजर करण्यात आले.
न्यायालयाने या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तिन्ही आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यानुसार त्यांची रवानगी येरवडा मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे.
सोशल मीडियावर कोणतीही पोस्ट करताना ती कायदेशीर चौकटीत असावी, कुणाच्याही धार्मिक भावना दुखावल्या जाणार नाहीत याची काळजी घ्यावी, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे. अफवा पसरवणाऱ्या किंवा आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा स्पष्ट इशाराही पोलिसांनी दिला आहे.
