दिल्ली : पूजा खेडकरच्या अटकपूर्व जामीन अर्जावर दिल्ली उच्च न्यायालयात आज सुनावणी झाली. या सुनावणीत युपीएससीकडून प्रतिज्ञापत्र दाखल करत तिला जामीन देण्यास विरोध केला. पूजा खेडकरला चौकशीसाठी ताब्यात घेणं आवश्यक असून तिला जामीन देणं योग्य नाही असं युपीएससीने प्रतिज्ञापत्रात म्हटलंय. मात्र दिल्ली उच्च न्यायालयाने पूजा खेडकरला दिलासा दिला असून तिच्या अटकपूर्व जामिनाची तारीख वाढवली आहे.
advertisement
युपीएससीकडून प्रतिज्ञापत्रात म्हटलंय की, पूजा खेडकरने बनावट कागदपत्रांच्या आधारे २०२२ च्या आयएएस परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी कुणाची मदत घेतली हे चौकशीनंतर स्पष्ट होईल. त्यासाठी तिला अटक करावी लागेल. या प्रकरणी आवश्यक ते सर्व पुरावे गोळा करण्यासाठी चौकशीची गरज आहे. पूजाच्या अटकेनंतर आणि चौकशीनंतरच यातील सत्य समोर येईल.
दिल्ली उच्च न्यायालयाने पूजा खेडकरच्या अटकपूर्व जामीनाची तारीख २९ ऑगस्टपर्यंत वाढवली. पूजा खेडकरच्या वकिलांनी न्यायालयात सांगितलं की, युपीएससीने २० ऑगस्टला त्यांच्या प्रतिज्ञापत्रात प्रतिसाद दिलाय. त्यामळे त्याचा अभ्यास करायला वेळ हवा आहे. पुढच्या सुनावणीत आता पूजा खेडकरला जामीन मिळणार की अटक होईल हे स्पष्ट होणार आहे.
