पुणे : सागर कदम आणि मयुरी दांडगे पुण्याच्या या तरुण तरुणीचं त्यांच्या घरच्यांनी लग्न ठरवलं. सुपारी फोडण्याच्या कार्यक्रमामध्ये लग्नाची तारीखही ठरली. लग्नाची तारीख ठरल्यानंतर सागर आणि मयुरी यांनी प्री-वेडिंग फोटो शुटही केलं. लवकरच नव्या नात्याला सुरूवात होणार असल्यामुळे सागर आनंदी होता तर मयुरीच्या चेहऱ्यावरही हसू होतं. प्री-वेडिंग फोटो शुट करताना मयुरी हसत होती, पण तिच्या मनामध्ये काहीतरी वेगळंच शिजत होतं, ज्याची कल्पनाही सागरला नव्हती.
advertisement
पिक्चरला जायचा आग्रह
प्री-वेडिंग शुट झाल्यानंतर दोघं घरी गेले, त्यानंतर एक दिवस अचानक मयुरीने सागरला फोन केला आणि पिक्चर पाहायला जाण्याचा आग्रह केला. यानंतर सागर मयुरीला घेऊन पिक्चरला गेला. दोघंही पिक्चर पाहून घरी निघाले. सागरने मयुरीला तिच्या मामाच्या मुलीच्या घरी सोडलं आणि मग तोही त्याच्या घरी निघाला.
मयुरीला घरी सोडून एक किमी जात नाही तोच दौंड हायवेच्या खामगाव फाट्यावर एका चारचाकीने सागरला रोखलं. गाडीतून तीन ते चार जण उतरले आणि त्यांनी सागरला लाकडी दांडक्याने मारहाण करायला सुरूवात केली. मयुरीसोबत लग्न केलंस तर जीवे मारू, अशी धमकीही त्यांनी सागरला दिली. सागरवर हल्ला करून हल्लेखोर तिथून फरार झाले, पण सागर तिथेच बेशुद्ध अवस्थेमध्ये पडून होता.
काही काळानंतर सागरला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. हल्ल्यामध्ये सागरचा पाय फ्रॅक्चर झाला तर डोक्याला आणि पाठीलाही दुखापत झाली. शुद्धीमध्ये आल्यानंतर सागरने पोलिसांना घडलेला सगळा प्रकार सांगितला आणि मग पोलिसांनी त्यांची सूत्र फिरवली. संशयीत आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर त्याने दिलेली माहिती ऐकून पोलिसांच्याही पायाखालची जमीन सरकली.
मयुरीला सागर पसंत पडला नव्हता. सागरसोबत लग्न करायचं नव्हतं म्हणून मयुरीने सागरला मारण्यासाठी दीड लाख रुपयांची सुपारी दिली होती. याप्रकरणी दौंडमधल्या यवत पोलिसांनी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला, यातल्या पाच जणांना पोलिसांनी अटक केली, पण या कटामधली मुख्य सूत्रधार मयुरी अजूनही फरार आहे.