शहरात मोकाट कुत्र्यांचा हैदोस वाढत असून, आता सिंहगड परिसरात तीन मुलांना कुत्र्याने चावा घेतल्याचे समोर आलं. नारायण नगर आणि गोसावी नगर या भागांत ही घटना घडली असून, जखमी मुलांना तातडीने रुग्णालयात दाखल केलं. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, पुणे महापालिका प्रशासनाने यावर तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी स्थानिक लोकांकडून होत आहे.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, सिंहगड परिसरातील नारायण नगर आणि गोसावी नगरात खेळत असलेल्या लहान मुलांना मोकाट कुत्र्याने अचानक चावा घेतला. या हल्ल्यात मुले जखमी झाली आहेत. त्यांना लगेच प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले, जिथे त्यांच्यावर उपचार करून रेबीजची लस देण्यात आली आहे. हाताला, पायाला आणि पाठीवर कुत्र्यांनी चावा घेतल्याची माहिती मिळाली आहे.
गेल्या काही काळापासून पुण्यातील अनेक भागांत मोकाट कुत्र्यांची संख्या वाढली आहे. हे कुत्रे अनेकदा लहान मुलांना आणि रस्त्यावरुन जाणाऱ्या लोकांवर हल्ले करत असतात. यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी महापालिका प्रशासनाच्या निष्काळजीपणावर तीव्र संताप व्यक्त केला आहे.