प्रत्येक एसटी बसमध्ये ‘ब्रेथ अॅनालायझर’
एसटीमधून दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. गावखेड्यांपासून ते शहरापर्यंत या सेवेशी अनेक नागरिक जोडलेले आहेत. प्रवाशांना सुरक्षित सेवा देणे हे एसटी प्रशासनाचे पहिले कर्तव्य मानले जाते. मात्र काही चालक कर्तव्यावर असताना मद्यपान करून बस चालवतात किंवा प्रवाशांशी गैरवर्तन करतात. अशा घटनांमुळे अपघात होऊन प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो.
advertisement
प्रशासनाने वेळोवेळी तपासणी मोहिमा राबवल्या असून, दोषी चालकांवर कारवाईही केली जाते. तरीही अशा घटना थांबलेल्या नाहीत. या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी नव्या बस खरेदी करताना महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. येत्या काळात ताफ्यात दाखल होणाऱ्या प्रत्येक नव्या बसमध्ये चालकाजवळ ‘ब्रेथ अॅनालायझर’ यंत्र बसवले जाणार आहे. चालकाने बस सुरू करण्यापूर्वी श्वास परीक्षण करणे आवश्यक असेल. परीक्षणात मद्यपान आढळल्यास बस सुरू होणार नाही.
लवकरच एसटीच्या ताफ्यात आठ हजार नव्या बस
एसटीच्या ताफ्यात पुढील काही वर्षांत मोठी वाढ होणार आहे. पुढील पाच वर्षांत तब्बल 25 हजार बस ताफ्यात सामील करण्याची योजना असल्याची माहिती एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. पहिल्या टप्प्यात आठ हजार नव्या बस खरेदीची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. या नव्या बसमध्ये चालकाजवळ ‘ब्रेथ अॅनालायझर’ यंत्र बसवले जाणार आहे.
दरम्यान, सध्या एसटीच्या ताफ्यात जवळपास 14 हजार बस आहेत. त्यापैकी 12 हजार 500 बस विविध मार्गांवर धावत आहेत. नव्या बसच्या समावेशामुळे प्रवाशांना अधिक सुरक्षित आणि दर्जेदार सेवा मिळेल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.






