नाशिकच्या खरात प्रकरणानंतर या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. गुन्हा दाखल होताच पुणे पोलिसांची विविध पथके ऋषिकेश वैद्यचा माग काढत होती. अखेर शुक्रवारी संध्याकाळच्या सुमारास तो पिंपरी परिसरात असल्याची पक्की माहिती मिळाली आणि पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या.
advertisement
प्रकरण काय?
वसईचा रहिवासी असलेल्या ऋषिकेशने फेसबुकच्या माध्यमातून पुण्यातील एका विवाहित महिलेशी मैत्री केली होती. "ईश्वराची उपासना कशी करायची, याचे तंत्र तुला शिकवतो," असे सांगून त्याने महिलेचा विश्वास संपादन केला. डिसेंबर २०२३ मध्ये त्याने पुण्यात येऊन महिलेला गुंगीचे औषध दिले आणि तिच्यावर बलात्कार केला. पीडितेने आधी वसईच्या माणिकपूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती, जी नंतर तपासासाठी हडपसर पोलिसांकडे वर्ग करण्यात आली होती.
ऋषिकेश वैद्य याच्यावर केवळ या एका महिलेवरच नव्हे, तर इतरही अनेक महिलांची फसवणूक केल्याचा संशय आहे. त्याला अटक केल्यानंतर आता त्याची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात येईल. या काळात त्याच्याकडून इतर पीडित महिलांची माहिती आणि त्याने केलेल्या गुन्ह्यांचा सखोल तपास केला जाणार आहे.
