धक्कादायक बाब म्हणजे आरोपीनं तक्रारदाराचा विश्वास संपादन करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ‘कॉन्फरन्स कॉल’ केल्याचा देखावा केला. तसेच इतरही बनावट अधिकारी उभे केले. गोपनीय मिशनच्या बदल्यात ३८ कोटींचे बक्षीस मिळणार आहे, असं सांगत ही लूट केली. फसवणुकीच्या प्रकरणात तक्रारदार अधिकाऱ्याचेच काही नातेवाईक सहभागी असल्याचं स्पष्ट झालं आहे. या प्रकरणी ५३ वर्षीय व्यक्तीने पोलिसात तक्रार दिली आहे. यावरून पर्वती पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
advertisement
याबाबत तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी शुभम सुनील प्रभाळे, सुनील बबनराव प्रभाळे, ओंकार सुनील प्रभाळे, प्रशांत राजेंद्र प्रभाळे आणि भाग्यश्री सुनील प्रभाळे या पाच संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा सगळा प्रकार २०१९ पासून सुरू होता. फिर्यादी यांच्या मेहुण्याने शुभम गुप्तचर खात्यात कार्यरत आहे. त्याने एक मिशन पूर्ण केले असून त्याला ३८ कोटींचे बक्षीस मिळणार आहे, अशी बतावणी केली. मात्र हे बक्षीस मिळवण्यासाठी प्रोसेसिंग फी, वकिलांची फी, वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटवस्तू देणे गरजेचे असल्याचं सांगितलं.
फिर्यादी यांचा विश्वास संपादन करण्यासाठी आरोपींनी केंद्रीय गृहमंत्र्यासमवेत ‘कॉन्फरन्स कॉल’ केल्याचा देखावा केला. या सर्व बनावट संवादांवर विश्वास ठेवून फिर्यादी यांनी गेल्या चार वर्षांत सतत रक्कम भरली. गेल्या चार वर्षांपासून फिर्यादी यांनी आरोपींच्या विविध खात्यांवर कोट्यवधी रुपयांचा व्यवहार केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हा सगळा प्रकार बनाव असल्याचे लक्षात आल्यावर फिर्यादी यांनी थेट पोलीस ठाणे गाठले. याप्रकरणी आता पोलिसांनी हा गुन्हा आर्थिक गुन्हे विभागाकडे वर्ग केला असून पुढील तपास सुरू आहे. हे पैसे भरण्यासाठी तक्रारदाराला आपले घर, दोन ते तीन फ्लॅट, जमीन आणि गाडी विकावी लागली आहे. त्यामुळे ते रस्त्यावर आले असून ते एका स्वयंसेवी संस्थेच्या धर्मशाळेत वास्तव्याला गेले आहेत.