सोमवारी सकाळी 7.25 वाजता 148 क्रमांकाची पीएमपी बस शेवाळेवाडीहून पिंपळे गुरवकडे जात होती. हडपसर गाडीतळ येथून शाळेसाठी बसमध्ये चढलेल्या एका शालेय विद्यार्थिनीने कंडक्टर दराडे यांच्याकडे वैद्यूवाडीचे 5 रुपयांचे तिकीट मागितले. वैद्यूवाडी आणि त्यानंतर भैरोबा नाला हे दोन्ही थांबे येऊन गेले, तरीही मुलगी उतरली नाही. ही गोष्ट अनुभवी कंडक्टर स्वप्ना दराडे यांच्या लगेच लक्षात आली. त्यांनी मुलीला याबाबत विचारले असता, तिने आपण शेवटच्या थांब्यावर उतरणार असल्याचे आणि वडील बसमध्येच असल्याचे सांगितले. परंतु, बसमध्ये तिचे वडील कुठेही दिसले नाहीत. यामुळे दराडे यांना संशय आला की, काहीतरी गडबड आहे
advertisement
पुणेकरांनो सावधान! औंध पाठोपाठ आता धानोरीत पहाटेच दिसला बिबट्या; नागरिकांची झोपच उडाली
परिस्थितीचं गांभीर्य ओळखून कंडक्टर दराडे यांनी धाडस दाखवलं आणि चालक बालाजी कांबळे तसंच बसमधील प्रवाशांच्या मदतीने बस महात्मा गांधी (पुलगेट) बसस्थानकावर थांबवली. स्थानकावर त्यांनी वाहतूक निरीक्षक सुनील कोलते आणि शामराव टकले यांना घडलेला सर्व प्रकार सांगितला. यावेळी मुलीला धीर देत विचारपूस केली, पण घाबरल्यामुळे ती व्यवस्थित काहीही सांगू शकत नव्हती. मात्र, तिच्या शाळेच्या गणवेशावरील बॅचवर हडपसर येथील आदर्श विद्या मंदिर शाळेचं नाव होतं.
स्वप्ना दराडे यांनी तातडीने शाळेत संपर्क साधला. शाळेतील शिक्षकांनी मुलीच्या सहावीच्या वर्गशिक्षकांना माहिती दिली. वर्गशिक्षकांनी कोणतीही वेळ न दवडता, तिच्या आईचा संपर्क क्रमांक कंडक्टर दराडे यांना दिला. या माहितीच्या आधारे त्यांनी मुलीच्या आईशी संपर्क साधला, तसंच खबरदारी म्हणून पोलिसांनाही संपर्क केला होता. अखेर मुलीची आई पुलगेट स्थानकावर पोहोचल्यावर, या 'देवदूत' कंडक्टरने मुलीला तिच्या आईच्या स्वाधीन केलं. कंडक्टर दराडे यांच्या या सामाजिक भान आणि प्रसंगावधानामुळे एका चिमुकलीचं मोठं नुकसान टळलं.
