विद्यापीठ चौक हा पुण्यातील अत्यंत वर्दळीचा आणि वाहतूक कोंडीचा केंद्रबिंदू मानला जातो. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, आयटी कंपन्या, शैक्षणिक संस्था तसेच औंध, बाणेर, कोथरूड आणि पाषाण या भागांना जोडणारा हा मार्ग असल्याने येथे नेहमीच प्रचंड वाहतूक असते. उड्डाणपूल सुरू झाल्यानंतर चौकातील कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होईल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे. या पुलामुळे गणेशखिंड रस्त्यावरील प्रवासाचा वेळही लक्षणीयरीत्या कमी होणार आहे.
advertisement
दरम्यान, बहुप्रतिक्षित हिंजवडी–शिवाजीनगर मेट्रो प्रकल्पाबाबतही सकारात्मक बातमी देण्यात आली. हिंजवडीपासून शिवाजीनगरपर्यंतच्या मेट्रो मार्गाचे काम अंतिम टप्प्यात असून, येत्या एक ते दोन महिन्यांत ही मेट्रो सेवा सुरू होईल, असा विश्वास डॉ. म्हसे यांनी व्यक्त केला. आयटी कर्मचारी, विद्यार्थी आणि नोकरदार वर्गासाठी ही मेट्रो सेवा अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
विद्यापीठ चौकातील उड्डाणपूल, मेट्रो प्रकल्प आणि आधुनिक तंत्रज्ञानाधारित प्रशासनामुळे पुण्याच्या पायाभूत सुविधांमध्ये लक्षणीय बदल घडणार असून, याचा थेट फायदा पुणेकरांच्या दैनंदिन जीवनाला होणार आहे.






