या उपक्रमामागे कार्यरत असलेले कुलदीप आंबेकर यांनी 2018 साली स्टुडंट हेलपिंग हॅण्डची स्थापना केली. शिक्षणासाठी पुण्यात येणाऱ्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या अडचणी त्यांनी जवळून अनुभवल्या. आर्थिक दुर्बलता, निवासाचा प्रश्न आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे पौष्टिक आहाराची कमतरता या सर्व समस्यांवर उपाय म्हणून त्यांनी फूड स्कॉलरशिपची कल्पना राबवली.
Mumbai Food : भट्टी शोरमा आणि मोमोज, फक्त 70 रुपयांपासून घ्या आस्वाद, मुंबईतील हे ठिकाण माहितीये का?
advertisement
आंबेकर सांगतात, ग्रामीण भागातून पुण्यात येणारे अनेक विद्यार्थी गरीब असतात. काहींचे पालक नाहीत किंवा एकल पालक आहेत. अशा विद्यार्थ्यांसाठी दररोज सकस अन्न देण्याची जबाबदारी आमची संस्था घेत आहे. सकाळी आणि संध्याकाळी दोन वेळचे पौष्टिक जेवण आम्ही देतो. या मुलांची आरोग्य तपासणी केल्यानंतर लक्षात आले की, त्यांच्यात ॲनिमियाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे, ज्याचा थेट परिणाम त्यांच्या शिक्षणावर आणि आरोग्यावर होतो.
फूड स्कॉलरशिप देण्याआधी विद्यार्थ्यांची मुलाखत घेतली जाते. त्यांच्या परिस्थितीचा सखोल अभ्यास करून योग्य विद्यार्थ्यांची निवड केली जाते. सध्या या उपक्रमांतर्गत एकाच वेळी 500 विद्यार्थी लाभ घेत आहेत. संस्थेने पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज, मॉडर्न कॉलेज, गरवारे कॉलेज, एस. पी. कॉलेज आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरात दुपारच्या आणि संध्याकाळच्या सत्रात विद्यार्थ्यांना जेवण दिले जाते.
कुलदीप आंबेकर पुढे सांगतात, आमचा हेतू केवळ अन्नदान नाही, तर या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडवणे आहे. आम्ही त्यांना करिअर गाईडन्स, व्यक्तिमत्त्व विकास आणि आरोग्य विषयक मार्गदर्शनही देतो. भविष्यात अधिकाधिक विद्यार्थ्यांना या उपक्रमाशी जोडण्याचा आमचा प्रयत्न आहे.
पुण्यात शिक्षण घेणाऱ्या ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी स्टुडंट हेलपिंग हॅण्ड हा उपक्रम म्हणजे एक प्रकारचा आधारस्तंभ ठरला आहे. या संस्थेच्या प्रयत्नांमुळे अनेक विद्यार्थ्यांचे शिक्षण अखंडपणे सुरू राहिले आहे आणि त्यांच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास फुलला आहे. आजच्या स्पर्धात्मक आणि महागाईच्या युगात जिथे अनेक विद्यार्थ्यांना दोन वेळचे अन्न मिळणेही कठीण झाले आहे, तिथे ही संस्था समाजासाठी प्रेरणादायी उदाहरण ठरत आहे. कुलदीप आंबेकर यांचे हे सामाजिक कार्य अनेक समाजसेवकांसाठी आदर्श ठरत आहे.





