हा अपघात महाराष्ट्राचे माजी मंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे आणि धाराशिव जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत यांच्या फॉर्च्युनर कारला झाला आहे. एका भरधाव कंटेनरने त्यांच्या कारला जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की गाडीचा काही भाग चक्काचूर झाला आहे, मात्र सुदैवाने सावंत यात सुखरूप बचावले आहेत.
नेमकी घटना काय?
advertisement
धनंजय सावंत हे बुधवारी मुंबईत भाजपमध्ये अधिकृत पक्षप्रवेशाचा मोठा सोहळा आटोपून आपल्या फॉर्च्युनर (MH 12 SE 5559) गाडीने परंड्याकडे येत होते. गुरुवारी (दि. १९) मध्यरात्री एकच्या सुमारास भिगवणजवळील डाळज २ गावाच्या हद्दीत आले असता, समोरून येणाऱ्या कंटेनरने (MH 12 WJ 6374) त्यांच्या वाहनाला भीषण धडक दिली.
ही धडक इतकी जोरात होती की आलिशान फॉर्च्युनरच्या चालकाच्या बाजूचा पूर्ण भाग चक्काचूर झाला आहे. मात्र या भीषण धडकेतून धनंजय सावंत यांना कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही. कारचालक आणि सुरक्षारक्षक किरकोळ जखमी झाले असून, त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
या अपघातावर प्रतिक्रिया देताना धनंजय सावंत यांनी न्यूज १८ मराठीला सांगितलं की, "कार्यकर्त्यांचे प्रेम, शुभेच्छा आणि ईश्वराची कृपा यामुळेच मी आज या भीषण अपघातातून सुखरूप बाहेर आलो आहे. थोड्या किरकोळ जखमा झाल्या असल्या तरी प्रकृती स्थिर आहे, कुणीही काळजी करू नये."
