चाकण : चाकणमधील दिवसेंदिवस वाढत चाललेली वाहतूक कोंडी आता गंभीर सामाजिक समस्येत रूपांतरित झाली आहे. स्थानिक नागरिक, कामगार, विद्यार्थी, व्यापारी, रुग्ण, डॉक्टर, उद्योजक आणि प्रवासी सर्वांचेच जीवन या कोंडीमुळे प्रभावित झाले आहे. या गंभीर समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी चाकण येथील आझाद हिंद मंडळाने एक अनोखा जिवंत देखावा उभारला आहे.
मंडळाने आपल्या 70 वर्षांच्या परंपरेतून सामाजिक भान जोपासत यंदा वाहतुकीची कोंडी हा विषय हाताळला. या देखाव्यात पुणे-नाशिक महामार्ग, चाकण-तळेगाव, चाकण-शिक्रापूर मार्गावरील वाहतुकीची तीव्र कोंडी प्रत्यक्ष उलगडून दाखवली आहे. वाहनांच्या रांगा, रस्त्यावर अडकलेले लोक, घाईत रुग्ण आणि धावत जाणारे डॉक्टर या सर्व दृश्यांनी प्रेक्षकांना ही समस्या जवळून अनुभवता येईल अशी कल्पना देण्यात आली आहे.
advertisement
विशेष म्हणजे, या देखाव्यात भविष्यातील परिस्थितीचा अंदाज देखील दाखवण्यात आला आहे. जर ही समस्या अशीच राहिली, तर 2025 मध्ये चाकण परिसरात वाहतूक आणखी भयंकर स्वरूपाची होईल, असे चित्रण कलाकारांनी सादर केले आहे. यात गाड्यांच्या रांगा रस्त्याबाहेर लांबून जातात, नागरिकांचे कामकाज ठप्प होते, अपघातांची शक्यता वाढते आणि सामाजिक जीवनावर गंभीर परिणाम होतो, असे दाखवले आहे.
स्थानिक कलाकारांनी अभिनय सादर करत वाहतूक मुक्त चाकण झाले पाहिजे हा संदेश प्रेक्षकांपर्यंत पोहोचवला आहे. या देखाव्यास स्थानिक नागरिकांसह परिसरातील प्रेक्षकांची मोठी गर्दी होत आहे. अनेकांनी या समस्येबद्दल आपले अनुभव शेअर केले आणि प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात असे आवाहन केले.
या जिवंत देखाव्याचे लेखन आणि संकल्पना दीपक मांडेकर यांनी केली असून त्यांनी वाहतूक कोंडीच्या गंभीरतेला प्रेक्षकांना समजून घेता येईल अशा प्रकारे सादर केले आहे. देखाव्यातील दृश्ये, अभिनय आणि संदेश यामुळे समाजातील प्रत्येक व्यक्तीला वाहतूक समस्येवर विचार करण्यास भाग पाडले आहे.
आझाद हिंद मंडळाच्या या उपक्रमामुळे चाकण परिसरातील वाहतूक व्यवस्थेची गंभीरता समजून घेणे शक्य झाले आहे. स्थानिक प्रशासनाने योग्य पावले उचलली तरच ही समस्या लवकरच सुटू शकेल असा संदेश देखाव्यासह प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यात आला आहे. हा देखावा केवळ मनोरंजनापुरता मर्यादित नसून समाजाला जागरूक करण्याचा एक प्रभावी माध्यम ठरला आहे.