अनेक भागांमध्ये गुडघाभर पाणी साचलं असताना पुणेकर त्या पाण्यातून वाट काढत आहेत. अनेक नोकरदार दुपारी ऑफिसमधून सुटल्यानंतर त्यांना पावसातून वाट काढत घरी पोहोचावं लागत आहे. आज हनुमान जयंती आहे. महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरामध्ये हनुमान जयंती साजरी केली जात आहे. पुणे शहरामध्ये हनुमान जयंती साजरी करण्यासाठी तयारी करणाऱ्या उत्साही भक्तांच्या आनंदावर पावसाने विरजण घातल्याने त्यांचा पुरता हिरमोड झालाय. शहरातील हनुमान मंदिरात पावसाचं पाणी आल्याने भक्तांची मोठी तारांबळ उडाली आहे. तर, हनुमान मंदिरासमोर असलेल्या उत्सव मंडपात देखील पाणी साचलं आहे.
advertisement
अवकाळी पावसामुळे पुणेकरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. रस्त्यावर पाणी साचल्यामुळे अनेकांच्या कारमध्ये देखील पाणी शिरले आहे. कारमध्ये पाणी शिरल्यामुळे कारचे सुद्धा मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. गुडघ्याभर पाण्यातून दुचाकीस्वारांना रस्ता काढणं फारच कसरतीचं काम झाले आहे. भर रस्त्यातच अनेकांच्या दुचाकी बंद पडल्यामुळे त्यांनाही धक्का मारत पुढे मार्गस्थ व्हावं लागत आहे. उत्तर पुणे जिल्ह्यातील खेड आंबेगाव जुन्नर शिरुर तालुक्यात वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाला सुरवात झाली आहे. गेल्या तीन दिवसांपासुन या परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस होत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून काढणीस तयार असलेला कांदा शेतातच खराब झाला आहे.
तर दुसरीकडे आंबा, डाळिंब यांसारख्या फळबागांनाही मोठा फटका बसत आहे. गारपिटीमुळे फळांची गळती झाली असून भाजीपाला आणि इतर पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. या नुकसानीमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून तात्काळ पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी जोर धरत आहे. पुणे जिल्ह्याला गारपिटीच्या पावसाने चांगलेच फटकारले आहे. या पावसाने नागरिकांसह शेतकरीही कमालीचे चिंतेत आले आहे.
