पुणे: भारतीय गुप्तचर यंत्रणांनी अलीकडे अहमदाबादसह देशातील काही महत्वाच्या ठिकाणांवर मोठा रासायनिक हल्ला करण्याचा डाव उधळून लावला. या कटात रिसीन नावाच्या अत्यंत घातक रसायनाचा वापर करण्यात आला होता. विशेष म्हणजे हे विष एरंडीच्या बियांपासून तयार होतं. एरंडीचं तेल अनेकांच्या घरी औषध म्हणून वापरलं जातं, पचनासाठी आणि इतर अनेक त्रासांवर ते उपयुक्त मानलं जातं. त्यामुळे औषधी मानल्या जाणाऱ्या एरंडीचा विष म्हणून वापर कसा केला गेला ? आणि महत्त्वाचं म्हणजे एरंडेच्या कोणत्या भागापासून विष तयार केलं जाऊ शकत ? याविषयी जाणून घेणार आहोत.
advertisement
अनेकांच्या मनात निर्माण झालेला प्रश्न म्हणजे, एरंडीचं तेल हे आरोग्यासाठी घातक आहे का? तर नाही. एरंडीचं तेल आरोग्यासाठी अजिबात घातक नाही, उलट ते उत्तम मानलं जातं. त्याचे फायदे देखील अनेक आहेत.पण जेव्हा एरंडीच्या बियांवर प्रक्रिया केली जाते, तेव्हा तेल निघाल्यानंतर जो चोथा किंवा गाळ शिल्लक राहतो, तो मात्र अतिशय धोकादायक असतो. या गाळामध्ये नैसर्गिकरित्या असलेला ‘रिसीन’ घटक राहतो आणि त्यापासून अतिशय जहाल विष तयार करता येऊ शकतं. रासायनिक हल्ल्यांच्या कटांमध्ये याच पदार्थाचा वापर करण्यात आला होता.
एरंडीच्या बियांमध्ये रिसीन नावाचा एक अतिशय विषारी घटक असतो पण बिया नैसर्गिक अवस्थेत असताना त्याचा काहीही धोका नसतो. मात्र प्रक्रिया करताना हा घटक वेगळा झाला, तर तो हानिकारक ठरू शकतो.एरंडीचं तेल मात्र पूर्णपणे सुरक्षित असतं. कारण रिसीन हा घटक तेलात मिसळतच नाही. तेल काढून घेतल्यानंतर जो गाळ मागे राहतो, त्यातच रिसीन घटक राहतो.त्यामुळे एरंडीचं तेल आपल्या आरोग्यासाठी अजिबात घातक नाही .पण वापर करण्याच्या आधी डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या.