पुणे: दिवाळी हा हिंदू धर्मातील अत्यंत महत्त्वाचा आणि आनंदाचा सण मानला जातो. दिव्यांची रोषणाई, फराळ आणि फटाक्यांची आतषबाजी यामुळे दिवाळीचे दिवस अधिक रंगतदार बनतात. या काळात फटाक्यांच्या विक्रीतून लाखो रुपयांची उलाढाल होते. अनेक जण या सणात फटाक्यांचा तात्पुरता व्यवसायही करतात.मात्र, हा व्यवसाय करण्यासाठी कोणती परवानगी आवश्यक असते आणि त्याची प्रक्रिया कशी असते, याबाबत फटाके विक्रेते मयूर सायगरे यांनी माहिती दिली आहे.
advertisement
फटाके विक्रेते मयूर सायगरे यांनी सांगितले की, ते गेल्या 20 वर्षांपासून फटाक्यांचा व्यवसाय करत आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, जर कुणाला फटाक्यांचा व्यवसाय सुरू करायचा असेल, तर तो 2 ते 3 लाख रुपयांत सुरू करता येतो. व्यवसाय सुरू करण्यासाठी विक्रीची जागा स्वतःची आहे की भाड्याने घेतलेली आहे, यावर आवश्यक कागदपत्रे अवलंबून असतात, असेही मयूर सायगरे यांनी सांगितले. या व्यवसायात स्टोरेज रॅक, पॅकिंग मटेरियल, बिलिंग मशीन तसेच अग्निशामक यंत्र किंवा अग्निसुरक्षा प्रणाली यांसारखी उपकरणे असणे अनिवार्य असते.
फटाके विक्रीचा व्यवसाय सुरू करण्यासाठी PESO (Petroleum and Explosives Safety Organisation) परवाना, व्यापार परवाना, GST नोंदणी, अग्निशमन विभागाची NOC तसेच पोलीस किंवा महानगरपालिका परवानगी घेणे आवश्यक आहे.भारतामध्ये तामिळनाडूतील शिवकाशी हे फटाक्यांचे प्रमुख उत्पादन आणि घाऊक विक्री केंद्र म्हणून ओळखले जाते. येथून देशभर फटाक्यांचा मोठ्या प्रमाणात साठा वितरित केला जातो. याशिवाय गुजरातमधील अहमदाबाद, सुरत आणि वडोदरा या शहरांमध्येही स्थानिक घाऊक विक्रेते उपलब्ध आहेत.
फटाक्यांची बुकिंग जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यापासूनच सुरू होते. या काळात गुंतवणूक केल्यास फटाके तुलनेने कमी दरात मिळू शकतात. साधारणपणे 2 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर 10 दिवसांच्या कालावधीत 3 ते 3.50 लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न मिळवता येते अशी माहिती मयूर यांनी दिली.