एसी कोचला प्रवाशांचा जास्त प्रतिसाद
लांब पल्ल्याचा प्रवास असो वा गावी जाण्यासाठी प्रवासी आता रेल्वेच्या एसी कोचला प्राधान्य देतात. कारण रेल्वेच्या एसी कोचमधील प्रवास आता अधिक आरामदायक आणि सोयीस्कर झाला आहे. प्रवाशांना त्यांच्या प्रवासादरम्यान बेडशीट, ब्लँकेट, उशी, टॉवेल आणि पिलो कव्हरसारख्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. या वस्तू प्रवाशांच्या आरामासाठी महत्त्वाच्या ठरतात आणि त्या प्रवास संपेपर्यंत वापरायला मिळतात. मात्र, अनेकदा प्रवासी सीट सोडताना या वस्तू परत न करताच स्वतःच्या बॅगेत भरून नेतात. अशा प्रकरणांमुळे रेल्वे प्रशासनाने कडक नियम लागू केले आहेत आणि चोरीसंबंधी शिस्तीत कारवाई सुरू केली आहे.
advertisement
रेल्वेतील उशी-बेडशीट चोरल्यास काय होते?
रेल्वे मालमत्तेची चोरी करणाऱ्यांसाठी रेल्वे प्रॉपर्टी अॅक्ट, 1966 अंतर्गत कठोर शिक्षा ठरवली आहे. या कायद्यानुसार एसी कोचमधील वस्तू चोरी केल्यास पहिल्या गुन्ह्यासाठी एक वर्षापर्यंत तुरुंगवास किंवा 1,000 रुपयांपर्यंत दंडाची तरतूद आहे. जर हेच उल्लंघन वारंवार घडले किंवा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असेल तर दोषींना पाच वर्षांपर्यंत कैद आणि दंड होऊ शकतो. या तरतुदीमुळे प्रवाशांना चेतावणी दिली जाते की, कोचमधील सुविधा फक्त प्रवासाच्या काळासाठी उपलब्ध आहेत आणि सीट सोडताना अटेंडंटकडे परत करणे आवश्यक आहे.
रेल्वे प्रशासनाने चोरी रोखण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत आणि नियमित तपासण्या केल्या जात आहेत. प्रवाशांनी जर वस्तू परत न केल्या तर लगेच तक्रार नोंदवली जाते आणि दोषींवर कायदेशीर कारवाई केली जाते. या वस्तूंमध्ये बेडशीट, ड्युप्लीकेट सेट, ब्लँकेट, उशी, पिलो कव्हर, हँड टॉवेल आणि बाथ टॉवेल यांचा समावेश आहे. प्रवाशांनी या वस्तू वापरल्यानंतर ताबडतोब परत करणे आवश्यक आहे, अन्यथा त्यांच्यावर दंड किंवा गुन्हा दाखल केला जाऊ शकतो.
रेल्वेचे नुकसान करणे आणि मालमत्ता चोरी करणे हा कायदेशीर दृष्ट्या गुन्हा आहे. यात प्लेटफॉर्मवरील साहित्यापासून कोचमधील वस्तूंपर्यंत सर्व समाविष्ट आहेत. कोणत्याही प्रकारे रेल्वेची मालमत्ता चोरी करणे, खराब करणे किंवा अस्वच्छता पसरवणे दंडनीय आहे. उदाहरणार्थ प्लॅटफॉर्मवर थुंकणे, कचरा टाकणे किंवा कोचमध्ये अस्वच्छता निर्माण करणे हे आता दंडास पात्र आहे. अशा प्रकरणांमध्ये दंड 500 रुपयांपर्यंत होऊ शकतो तसेच गुन्ह्याच्या गंभीरतेनुसार 1 ते 5 वर्षांपर्यंत कैद होऊ शकते.
रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना सूचित केले आहे की एसी कोचमधील सुविधा प्रवासाच्या आरामासाठी आहेत आणि त्यांचा गैरवापर गंभीर शिक्षा घेऊन येऊ शकतो. प्रवाशांनी या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. अन्यथा कायदेशीर कारवाई टाळणे अशक्य आहे. अशा उपाययोजनांमुळे रेल्वे प्रवास अधिक सुरक्षित, स्वच्छ आणि प्रवाशांसाठी सोयीस्कर बनवला जात आहे.