मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यात आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून चक्क मेट्रो मार्गीकेवर आंदोलन करण्यात आलं. राज्यातील तरुणांची वाढती बेरोजगारी आणि पुणे शहरातील इतर प्रश्नासठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून थेट मेट्रो मार्गीकर आंदोलन करत मेट्रो मार्ग बंद करण्यात आला.
पुणे महानगरपालिकेच्या समोरअसणाऱ्या मेट्रो स्टेशनवर राष्ट्रवादीचे कार्यकर्त्यांकडून हे आंदोलन करण्यात आलं असून तब्बल एक तास आंदोलनकर्त्यांकडून मेट्रो रोखण्यात आली होती. तर या आंदोलनावेळी पोलीस आणि पत्रकारांसोबत देखील या कार्यकर्त्यांनी बाचाबाची केलेली पाहायला मिळाली. अनेक वेळा विनंती करून देखील आंदोलन करते मेट्रो मार्गावरून भेटत नसल्याने पोलिसांनी धर पकड करत आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. तर ज्या कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केलं त्या कार्यकर्त्यांचे पक्षातून निलंबन देखील केल गेलं आहे. या आंदोलनावेळी मोठा गोंधळ उडालेला पाहायला मिळाला.
advertisement
पक्षातून स्टंटबाज कार्यकर्त्याची हकालपट्टी
नरेंद्र पावटेकर असं या स्टंटबाज आंदोलकाचं नाव असल्याचं समोर आलं आहे. मेट्रो रुळावर आंदोलन करून प्रशासनाला वेठीस धरणाऱ्या आंदोलकांची पार्टीतून तात्काळ हकालपट्टी करणार आहे, अशी माहिती शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिली.
नेमकं काय घडलं?
आज दुपारी पाऊण वाजताच्या सुमारास पुणे मेट्रोच्या पुणे महानगरपालिका मेट्रो स्थानकाच्या रुळांवरती एका राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केलं. हे आंदोलनकर्ते २-४ लोकांच्या गटांनी मेट्रो स्थानकात प्रवासी म्हणून आले आणि त्यांनी अचानक मेट्रो रुळांवर उड्या मारल्या. मेट्रोच्या सुरक्षा रक्षकांनी प्रसंगावधान राखत मेट्रो सेवा तत्काळ थांबविली. हे कार्यकर्ते पुणे मेट्रोच्या रूळांवर आणि बाजूच्या कठड्यांवर बसून आंदोलन करत होते. घटनेचे गांभीर्य ओळखून महा मेट्रोचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि पोलीस आणि अग्निशामक दलाला ही माहिती देऊन बोलवण्यात आलं. या आंदोलनादरम्यान मेट्रोची सेवा काही काळ बंद करण्यात आली होती. या सर्व आंदोलनकर्त्याना शिवाजीनगर पोलीस ठाण्यात नेण्यात आले आहे. पुणे मेट्रो कडून त्यांच्यावर रीतसर पोलीस तक्रार (FIR) दाखल करण्यात आलेली आहे.
मेट्रो सेवा केली होती बंद
या आंदोलनादरम्यान, पुणे मेट्रोची मार्गिका-1 वरील सेवा पिंपरी चिंचवड स्थानक ते स्वारगेट स्थानक या दरम्यान सुरळीत सुरू होती. तर मार्गिका-२ वरील सेवा रामवाडी ते जिल्हा न्यायालय मेट्रो स्थानक आणि वनाझ स्थानक ते छत्रपती संभाजी उद्यान मेट्रो स्थानक यादरम्यान सुरू होती. दुपारी पाऊण ते पावणे तीन या काळामध्ये पीएमसी मेट्रो स्थानकातील सेवा बंद ठेवण्यात आली होती. दुपारी पावणे तीन नंतर पुणे मेट्रोची सेवा आता पूर्ववत सुरू झाली आहे. सेवा बंद करण्यात आल्यामुळे प्रवाश्यांना झालेल्या असुविधेबद्दल पुणे मेट्रो दिलगिरी व्यक्त करीत आहे.