वैद्यकीय पथक पिंपरी-चिंचवडमधील गणेश तलाव, वाल्हेकरवाडीतील जाधव घाट, काळेवाडी स्मशान घाट, पिंपरी सुभाषनगर घाट, वाकड गावठाण घाट, मोशी नदी घाट, चिखली स्मशान घाट, केजुदेवी बंधारा घाट, सांगवी घाट आणि पिपळे गुरव येथील घाटांवर तैनात आहेत. महापालिकेच्या या प्रयत्नांमुळे विसर्जनावेळी नागरिकांना तातडीने वैद्यकीय सेवा मिळणार असून, कोणत्याही गंभीर अपघाताची शक्यता कमी होईल.
advertisement
गणेश विसर्जनामुळे मोठ्या प्रमाणात निर्माल्य पाण्यात मिसळते, ज्यामुळे जलप्रदूषण वाढते. या समस्येवर मात करण्यासाठी शहरातील प्रमुख ठिकाणी निर्माल्य संकलन कुंड बसवण्यात आले आहेत. नागरिकांनी हार, फुले, पाने आणि पूजेसामग्री या कुंडांमध्ये टाकण्याचे आवाहन करण्यात आले आहे. संकलित केलेले निर्माल्य नंतर प्रक्रिया करून सेंद्रिय खत तयार केले जाईल. त्याचबरोबर यावर प्रक्रिया करून सुगंधी द्रव्य तयार करण्याचा उपक्रमही राबविण्यात येणार आहे.
डॉ. लक्ष्मण गोफणे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, पिंपरी-चिंचवड महापालिका यांनी सांगितले की, विसर्जन घाटांवर वैद्यकीय पथक आणि रुग्णवाहिका सज्ज असून, अधिकारी-कर्मचाऱ्यांना सर्व आवश्यक उपकरणे तसेच औषधसाठा देण्यात आला आहे. तत्काळ उपचार आणि रुग्णवाहिका सेवेमुळे कुठलीही आपत्कालीन परिस्थिती तत्काळ हाताळता येईल. नागरिकांनी महापालिकेच्या मार्गदर्शनाचे पालन करून सुरक्षित आणि पर्यावरणपूरक विसर्जन सुनिश्चित करावे, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.