या पुलामुळे सिंहगड रस्त्यावरील वाहतुकीवर मोठ्या प्रमाणात नियंत्रण येणार आहे. आतापर्यंत राजाराम पूल ते फन टाईम थिएटर या अवघ्या 2.6 किमी अंतरावरील सहा चौक पार करण्यासाठी 30 मिनिटांचा वेळ लागत होता. मात्र, आता नव्या उड्डाणपुलामुळे हेच अंतर केवळ 5 ते 6 मिनिटांत पार करता येणार आहे. त्यामुळे पुणेकरांचा प्रवासाचा वेळ आणि इंधन वाचणार असून नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
advertisement
हा उड्डाणपूल तीन टप्प्यांत पूर्ण करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात राजाराम पूल चौक येथे 520 मीटर लांबीचा उड्डाणपूल बांधण्यात आला, ज्यासाठी 15 कोटी रुपये खर्च करण्यात आला. दुसऱ्या टप्प्यात विठ्ठलवाडी ते फन टाईम थिएटरदरम्यानचा 2.1 किमी लांबीचा पूल उभारण्यात आला, ज्यासाठी 61 कोटी रुपये खर्च आला. तिसऱ्या टप्प्यात वीर शिवाजी काशीद चौक ते कै. प्रकाश विठ्ठल इनामदार चौकदरम्यानचा 1.5 किमी लांबीचा उड्डाणपूल बांधण्यात आला असून, यासाठी 42 कोटी रुपये खर्च झाला. एकूण तिन्ही टप्प्यांसाठी 118.37 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे.
सिंहगड रस्त्याच्या एका बाजूला मुठा नदी आणि दुसऱ्या बाजूला डोंगर असल्यामुळे पर्यायी रस्ता उपलब्ध करणे अशक्य होते. त्यामुळे या उड्डाणपुलाचे बांधकाम अत्यावश्यक होते. दररोज दीड लाखांहून अधिक वाहनांची ये-जा या मार्गावरून होत असल्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या गंभीर होत होती. यावर तोडगा म्हणून पुणे महानगरपालिकेने उड्डाणपूल उभारण्याचा निर्णय घेतला. याचे भूमिपूजन केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते 21 सप्टेंबर 2021 रोजी करण्यात आले होते.
फक्त पुलाच नव्हे, तर पुलाखालील रस्त्याचेही सुयोग्य नियोजन करण्यात आले आहे. दोन्ही बाजूस तीन लेनची वाहतूक क्षमता उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याचबरोबर प्रशस्त पदपथ, पार्किंगची सोय, तसेच दुभाजकाचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. विशेष म्हणजे हे सुशोभीकरण सीएसआर अंतर्गत दोन एजन्सींमार्फत करण्यात आले असून पुढील पाच वर्षे त्याची देखभालही त्यांच्याकडूनच केली जाणार आहे.
या उड्डाणपुलामुळे धायरी, नऱ्हे, खडकवासला, वडगाव बुद्रुक, नांदेड सिटी तसेच मुंबई-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. पुणेकरांच्या वाहतुकीसाठी हा पूल एक महत्त्वाचा टप्पा ठरणार असून, कोंडीमुक्त प्रवासाची नवी सुविधा मिळाल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.