सध्या मोरवाडी ते भक्ती शक्ती चौक (निगडी) या दरम्यान मेट्रोचे काम सुरू आहे. या कामामुळे पुणे-मुंबई महामार्गावरील समतल विलगकातून बाहेर पडणाऱ्या वाहनांसाठी आणि सेवा रस्त्यावरून समतल विलगकामध्ये जाणाऱ्या वाहनांसाठी काळभोरनगर भुयारी मार्गाजवळ तात्पुरती सोय करण्यात आली आहे. मात्र ही सोय व्यवस्थित नियोजनाअभावी धोकादायक ठरत आहे. सेवा रस्त्यावरून समतल विलगकामध्ये जाणारी वाहने आणि समतल विलगकातून बाहेर पडणारी वाहने समोरासमोर येत असल्याने अपघाताला आमंत्रण मिळत आहे.
advertisement
अनेक वेळा भरधाव वेगाने येणारी वाहने अचानक समोर आल्याने चालकांना ब्रेक लावावे लागतात. अशा वेळी मागील वाहनांची धडक बसण्याची शक्यता वाढते. यामुळे प्रवाशांना जीवितहानीचा धोका तर आहेच, शिवाय रस्त्यावर गोंधळाची परिस्थिती निर्माण होते. अनेकदा वाहन मागे घेण्यावरून चालकांमध्ये वाद होतात. धक्काबुक्की आणि बाचाबाचीपर्यंत परिस्थिती पोहोचते. त्यामुळे स्थानिक नागरिक आणि वाहनचालक प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करत आहेत.
दरम्यान, या ठिकाणी रस्ता नियोजनाचा अभाव स्पष्ट दिसून येतो. महामार्गावरून येणारी वाहने आणि सेवा रस्त्यावरून येणारी वाहने यांच्यासाठी स्वतंत्र नियोजन केलेले नाही. यामुळे दोन्ही मार्ग एकाच ठिकाणी येऊन भिडतात. परिणामी वाहतूक सुरळीत न राहता अडथळे निर्माण होतात. ही परिस्थिती विशेषतः सकाळ-संध्याकाळच्या गर्दीच्या वेळी अधिक गंभीर बनते.
वाहतूक तज्ज्ञांच्या मते, या ठिकाणी तातडीने बदल करण्याची गरज आहे. सेवा रस्त्यावरील वाहने आणि महामार्गावरील वाहने यांना स्वतंत्र मार्ग दिल्यास अपघातांचे प्रमाण कमी होऊ शकते. तसेच वाहतूक पोलीसांची अतिरिक्त मनुष्यबळाची नेमणूक केल्यास शिस्तीने वाहतूक होऊ शकते.
काळभोरनगर परिसरातील ही स्थिती सध्या अपघातांसाठी धोक्याची घंटा ठरत आहे. महामार्गावरील गती आणि सेवा रस्त्यावरील गर्दी यामुळे गोंधळ उडतो आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देत योग्य ती उपाययोजना केल्याशिवाय अपघाताचा धोका कमी होणार नाही, असे नागरिकांचे मत आहे. त्यामुळे तातडीने नियोजनबद्ध बदल करणे अत्यावश्यक बनले आहे.