गेल्या काही महिन्यांपासून बोगद्याच्या मध्यभागी अनेक ठिकाणी रस्ता खचलेला दिसतो. खड्ड्यांची संख्या वाढल्यामुळे दुचाकी आणि चारचाकी वाहनांचे नियंत्रण सुटण्याची शक्यता अधिक वाढली आहे. यामध्ये सर्वात मोठी समस्या म्हणजे सतत वाहणारे पाणी. काही ठिकाणी पाणी साचत असून रस्ता निसरडा झाला आहे. विशेषतही म्हणजे पावसाळ्यात आणि रात्रीच्या वेळी हे खड्डे आणि पाणी दिसत नसल्याने वाहनचालकांचे अपघात होत आहेत. आतापर्यंत अनेकांना जीव गमवावा लागला असल्याची माहिती स्थानिकांकडून मिळत आहे.
advertisement
सुमारे दीड किलोमीटर लांबीचा हा बोगदा पूर्णपणे बंदिस्त असल्याने येथे नैसर्गिक प्रकाश पोहोचत नाही. सुरुवातीला वाहनचालकांच्या सोयीसाठी आधुनिक प्रकाशयोजना करण्यात आली होती. परंतु, वारंवार तांत्रिक अडचणींमुळे बोगद्यातील दिवे बंद राहतात. अंधारात खड्डे आणि अडथळे न दिसल्याने जलद वेगात धावणाऱ्या वाहनांना मोठा धोका निर्माण होतो. प्रकाशयोजनेच्या अभावामुळे अपघाताची शक्यता अनेक पटींनी वाढली आहे.
वाहनचालक सांगतात की बोगद्याच्या आत शिस्तबद्ध वाहतूक ठेवणे अवघड होत आहे. पाणी साचल्यामुळे घसरगुंडीप्रमाणे परिस्थिती होते. जड वाहनांना वेग कमी करावा लागतो तर दुचाकीस्वारांना प्रत्येक पावलावर जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो. प्रवाशांचे म्हणणे आहे की जर तातडीने उपाययोजना करण्यात आल्या नाहीत तर कोणत्याही क्षणी मोठी दुर्घटना होऊ शकते.
या सर्व पार्श्वभूमीवर स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांनी प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. त्यांनी रस्त्याची दुरुस्ती, योग्य ड्रेनेजची सोय, पाणी वाहून जाण्यासाठी नाले आणि दिव्यांची सातत्यपूर्ण देखभाल करण्याची मागणी केली आहे. महामार्ग हा राज्यातील महत्त्वाचा दळणवळणाचा मार्ग असल्याने दररोज लाखो वाहने या बोगद्याचा वापर करतात. त्यामुळे येथे झालेल्या अपघातांचा परिणाम मोठ्या प्रमाणात दिसून येतो.
नवीन कात्रज बोगदा बांधताना सुरक्षिततेचा विचार केला गेला असला तरी सध्या त्याची अवस्था गंभीर झाली आहे. खचलेला रस्ता, सतत पाणी वाहणे आणि प्रकाशयोजनेतील बिघाड यामुळे हा बोगदा अपघाताचा सापळा बनला आहे. या पार्श्वभूमीवर तातडीने दुरुस्ती आणि देखभाल न झाल्यास प्रवाशांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण होईल हे निश्चित. प्रशासनाने लवकरात लवकर लक्ष देऊन ठोस पावले उचलणे आवश्यक आहे.