गणेशोत्सवात सायंकाळनंतर रस्त्यांवर गणपती मंडळातील देखावे पाहण्यासाठी फिरतात आणि या गर्दीचा फायदा अनेक फेरीवाले घेतात. डोसा, पिझ्झा, बर्गर, वडापाव, समोसा, पाणीपुरी, भेळपुरी, मिसळ पाव, छोले भटूरे, आईस्क्रीम, कच्छी दाबेली, सॅण्डविच, पुरीभाजी, डाळभात, पुलाव यांसह विविध खाद्यपदार्थ विक्रीसाठी उपलब्ध आहेत. मात्र, अनेक ठिकाणी दर्जाहीन तसेच अस्वच्छ पद्धतीने हे पदार्थ तयार आणि विक्री केले जात असल्याचे चित्र समोर आले आहे.
advertisement
पाहणीत असे आढळले की काही ठिकाणी भाज्या शिळ्या किंवा सडक्या अवस्थेत वापरल्या जातात. भेसळयुक्त मसाले, कृत्रिम रंग आणि प्रमाणित नसलेले पदार्थही मोठ्या प्रमाणावर वापरले जात आहेत. खाद्यपदार्थ तयार करताना पुनःपुन्हा वापरलेले तेल वापरले जाते. त्याचबरोबर प्लेट, वाट्या धुण्यासाठी एकाच बादलीतील घाणे पाणी वापरले जाते. पिण्यासाठी स्वच्छ पाणी न देणे किंवा काही ठिकाणी पाणीच न देणे, अशी परिस्थिती आहे. प्लॅस्टिकच्या प्लेट्स आणि पार्सल पिशव्या वापरल्या जात असून त्याही वेळोवेळी धुतल्या जात नाहीत. हातमोजे, डोक्यावरील केस झाकणारी टोपी किंवा स्वच्छता राखण्यासाठी आवश्यक साहित्य याकडे पूर्णतः दुर्लक्ष केले जाते.
यापेक्षाही चिंतेची बाब म्हणजे अनेक विक्रेते तंबाखू, गुटखा खाऊन खाद्यपदार्थ तयार करताना किंवा विकताना दिसतात. गुटखा खाताना ग्राहकांशी बोलणे, थुंकणे, अगदी अन्न बनवताना हात स्वच्छ न धुता त्याचा थेट स्पर्श करणे अशी उघडपणे अस्वच्छता पाहायला मिळते. काही ठिकाणी तर विक्रेते धूम्रपान किंवा मद्यपान करूनच अन्न विकतात. यामुळे ग्राहकांच्या आरोग्यावर गंभीर धोका निर्माण होतो.
खाद्यपदार्थ विक्रीवरील अन्न प्रशासनाची तपासणी होत नाही, असे काही विक्रेत्यांनी सांगितले. नागरिकांनी बाहेरचे पदार्थ खाताना त्यांचा दर्जा व स्वच्छता तपासावी, अशी गरज व्यक्त होत आहे. उत्सवाच्या काळात चविष्ट पदार्थांची लज्जत घेण्याच्या ओढीने नागरिक स्टॉल्सकडे आकर्षित होतात; मात्र अस्वच्छतेकडे दुर्लक्ष केल्यास आरोग्यासाठी घातक ठरू शकते. म्हणूनच अशा पदार्थांची खरेदी व सेवन करताना नागरिकांनी विशेष दक्षता घेणे अत्यावश्यक आहे.