मध्य रेल्वेच्या अंतर्गत येणारे पुणे स्थानक हे शहरातील एक प्रमुख आणि गर्दीचे स्थानक आहे. दररोज येथे सुमारे दीडशेपेक्षा अधिक गाड्या चालतात आणि दीड लाखाहून अधिक प्रवासी प्रवास करतात. पुणे रेल्वे स्थानकाचे सहा फलाट आहेत, जिथे रेल्वे प्रशासन आणि आयआरसीटीसीने अधिकृत हॉटेल आणि अन्नविक्री स्टॉल नेमले आहेत. नियमांनुसार या स्टॉलवर सर्व आरोग्य आणि सुरक्षा नियम पाळून अन्नपदार्थ विकले जाणे अपेक्षित आहे.
advertisement
मात्र, अनेक स्टॉलवर वडापाव, समोसा, बटाटा भाजीसह इतर खाद्यपदार्थ तयार करून उघड्यावर ठेवले जातात. प्रवाशांनी मागणी केल्यास त्याच पदार्थांची विक्री केली जाते, ज्यामुळे हा प्रकार प्रवाशांच्या जीवासाठी धोकादायक ठरतो. हे लक्षात घेऊनही प्रशासनाच्या नियमित तपासणीत हा प्रकार काहीसा दुर्लक्षित होत असल्याचा प्रश्न उपस्थित होतो.
पुणे रेल्वे स्थानकावरील प्रवाशांनी यापूर्वीही खराब अन्न मिळाल्याबाबत तक्रारी केल्या आहेत. त्यानुसार रेल्वे प्रशासनाने काही ठिकाणी कारवाईही केली आहे. परंतु, सुधारणा अजूनही अपुरी राहिल्याचे दिसून येते. प्रवाशांचे आरोग्य आणि सुरक्षा लक्षात घेऊन, उघड्यावर खाद्यपदार्थ ठेवून विक्री करणाऱ्या हॉटेल आणि स्टॉलवर कठोर कारवाई करण्याची मागणी सुरू आहे.
अनधिकृत विक्रेत्यांवर प्रशासन नियमित कारवाई करीत असले तरी, अधिकृत स्टॉलवर होत असलेल्या उघड्या विक्रीवर लक्ष दिले जात नाही,हे गंभीर मुद्दा ठरत आहे. त्यामुळे, संबंधित हॉटेल आणि स्टॉलवर परवाने रद्द करून आवश्यक असल्यास गुन्हा दाखल करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने पुढाकार घ्यावा,अशी मागणी रेल्वे सल्लागार समितीच्या सदस्य आनंद सप्तर्षी यांनी केली आहे.
या प्रकारावर प्रभावी कारवाई झाली तरच प्रवाशांचे आरोग्य सुरक्षित राहू शकते,तसेच रेल्वे स्थानकातील खाद्यसेवा अधिक विश्वासार्ह आणि सुरक्षित बनू शकते. प्रशासनाने वेळेत पावले उचलली नाहीत ,तर प्रवाशांच्या जीवाशी खेळ होण्याचा धोका कायम राहील.
