शुक्रवारी टिळक रस्त्यावरील लोकमान्य सभागृहात मानाच्या पाच गणपती मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेतली. यामध्ये कसबा गणपती मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत शेटे, तांबडी जोगेश्वरी मंडळाचे प्रसाद कुलकर्णी आणि प्रशांत टिकार, गुरुजी तालीम मंडळाचे पृथ्वीराज परदेशी, तुळशीबाग मंडळाचे विकास पवार आणि नितीन पंडित तसेच केसरीवाडा मंडळाचे अनिल सकपाळ हे उपस्थित होते.
पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, विसर्जन मिरवणूक दरम्यान कोणत्या भागात विलंब होतो, मिरवणुकीतील मंडळांत अंतर का पडते, कोणत्या चौकांत ढोल-ताशा पथके जास्त वेळ वादन करतात याचा सखोल अभ्यास केला आहे. त्या अभ्यासाच्या आधारे, प्रत्येक पथकाला ठराविक चौक नेमून देण्यात आले आहेत. पथकांनी त्या ठिकाणीच मर्यादित वेळ वादन करायचे असून, इतरत्र केवळ जयघोष करण्यात येईल.
advertisement
या नियोजनामुळे ठराविक चौकांतील गर्दी आणि गोंधळ टाळला जाईल. स्थिर वादन कुठे करायचे आणि कुठे करू नये, याचे वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. यंदा प्रत्येक चौकात फक्त नेमून दिलेलेच पथक वादन करेल, त्यामुळे मिरवणूक रेंगाळण्याचे प्रकार कमी होतील, असा विश्वास पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
मिरवणुकीत जर एखाद्या ठिकाणी अडथळा निर्माण झाला किंवा मिरवणूक थांबली तर लगेचच रस्ता मोकळा करून देण्याची मागणी पोलिस प्रशासनाकडे करण्यात आली आहे. यामुळे वाहतुकीची कोंडी होणार नाही आणि बाप्पाच्या मिरवणुकीचा वेग सुरळीत राहील, असेही स्पष्ट करण्यात आले.
गेल्या काही वर्षांपासून विसर्जन मिरवणुकीत वेळेचा मोठा अपव्यय होत असल्याची टीका होत होती. या पार्श्वभूमीवर यंदा वेळेत मिरवणूक संपविण्याचा निर्धार हा सकारात्मक बदल असल्याचे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. गणेश भक्तांना पहाटेच बाप्पाच्या विसर्जनाचा सोहळा अनुभवता यावा, यासाठी मानाच्या मंडळांनी केलेले हे नियोजन महत्त्वाचे ठरणार आहे.