शरद पवार यांनी म्हटलं की, मला असं समजलं तुम्ही पदाधिकारी, कार्यकर्ते इकडे येताय म्हणून तुम्हाला धमक्या दिल्या जात आहेत. मी त्यांना सांगेन की सुनील शेळके, तुम्ही आमदार कुणामुळे झाला? तुझ्या सभेला कोण आलेलं? पक्षाचा अध्यक्ष कोण होतं? तुझ्या अर्जावर माझी सही आहे. हे लक्षात ठेवा. यापुढे असं काही केलंत तर मला शरद पवार म्हणतात. विसरू नका. मी त्या वाटेने जात नाही, गेलो तर कोणाला सोडत नाही अशा शब्दात शरद पवार यांनी मेळाव्यातून थेट आमदार सुनील शेळके यांना सुनावलं.
advertisement
अमित शहा नुकतेच महाराष्ट्र दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली होती. या टीकेलासुद्धा शरद पवार यांनी उत्तर देत हल्लाबोल केला. पवार म्हणाले की, देशाचे गृहमंत्री राज्यात आले होते. मुंबईत ते म्हणाले पन्नास वर्षे शरद पवार बसलेत. मी त्यांचा आभारी आहे. जनतेने पन्नास वर्षे माझ्यावर विश्वास ठेवले हे अमित शहांनी मान्य केलं. गेल्या १० वर्षांपासून मोदी सत्तेत आहेत. उत्पन्न वाढलं का? याऊलट शेतकरी आत्महत्या वाढल्या. त्यांच्यावर अशी वेळ आणली हीच मोदींची गॅरंटी का असा सवाल पवारांनी विचारला.