हा उपक्रम श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता. सकाळपासूनच मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी उसळली होती. अन्नकोटाच्या आकर्षक दर्शनासाठी आलेल्या पुणेकरांनी हे दृश्य मोबाईल कॅमेऱ्यात कैद केले. मंदिर परिसर तोरण, फुले, आणि रंगीबेरंगी रांगोळ्यांनी सजविण्यात आला होता. दिव्यांच्या प्रकाशात नटलेले मंदिर भक्तीभावाने उजळून निघाले होते.
advertisement
यावेळी ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी म्हणाले, "प्रत्येक वर्षीप्रमाणे यंदाही त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त अन्नकोटाचे आयोजन करण्यात आले. ट्रस्टतर्फे भाविकांना पदार्थ अर्पण करण्याचे आवाहन करण्यात आले होते आणि त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तब्बल 521 हून अधिक पदार्थ मंदिरात जमा झाले. हे सर्व पदार्थ बाप्पाच्या अन्नकोटामध्ये मांडून महानैवेद्य अर्पण करण्यात आला. या पवित्र प्रसंगी आम्ही गणरायाच्या चरणी प्रार्थना केली की, बळीराजावर आलेले संकट दूर व्हावे, महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात सुख-समृद्धी आणि शांतता नांदो."
अन्नकोटाच्या निमित्ताने मंदिर परिसरात प्रसाद वितरणाचे आयोजनही करण्यात आले होते. भाविकांनी भक्तिभावाने दर्शन घेत अन्नकोटाचे दर्शन आपल्या हृदयात साठविले. अन्नकोटाचा हा सोहळा केवळ भक्तीचा नाही तर सामाजिक एकतेचाही संदेश देणारा आहे. त्रिपुरारी पौर्णिमेच्या या पवित्र दिवशी बाप्पाच्या दरबारात साकारलेला हा अन्नकोट उत्सव पुणेकरांसाठी अविस्मरणीय ठरला.