मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात 2 एप्रिलला गारपीटीसह आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, छत्रपती संभाजी नगर, जालना, बीड, अमरावती, चंद्रपूर या सर्व जिल्ह्यांना हवामान विभागाकडून पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
कडक उन्हात सुकणार नाही तुळस, काळजी घेताना टाळा या चुका, राहील हिरवीगार
advertisement
कोकण आणि खानदेश मधील जिल्ह्यांना हवामान विभागाकडून 2 एप्रिलला पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, जळगाव या जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
त्याचबरोबर राज्यातील इतर उर्वरित काही जिल्ह्यांना सुद्धा हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोल्हापूर, सांगली, अकोला, भंडारा, बुलढाणा, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या सर्व जिल्ह्यांना 2 एप्रिलसाठी हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
मुंबईतील कमाल तापमान 33 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 25 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. तेथील कमाल तापमानात अंशतः घट झालेली दिसून येत आहे. पुण्यातील कमाल तापमान 34 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 23 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. पुण्यातील कमाल तापमानात देखील अंशतः घट झालेली दिसून येत आहे. पुढचे 2 दिवस पुण्यात पाऊस मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
छत्रपती संभाजी नगर मधील कमाल तापमान 35 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 24 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. येथील तापमानात दोन अंशांनी घट झालेली दिसून येत आहे. 2 एप्रिलपासून पुढील 24 तास याठिकाणी पावसाची शक्यता कायम आहे. नाशिकमधील कमाल तापमान 34 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 18 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. नाशिकमधील तापमानात 3 अंशांनी घट झालेली पाहायला मिळत आहे.
नागपूरमधील कमाल तापमान 36 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 22 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. 2 एप्रिल पासून पुढील 24 तास नागपूरमध्ये पावसाची शक्यता कायम आहे. पुढील काही दिवसांत नागपूरमधील तापमानात वाढ होणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
आधी तापमानाचा पारा आणि आता पावसाची शक्यता असल्याने राज्यात दमट वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आरोग्याच्या समस्या देखील उद्भवू शकतात. त्याचबरोबर गारपिटीचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आल्याने नागरिकांनी स्वतःची आणि शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.





