मुंबईसह मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यात पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, पुणे, सातारा, सांगली, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर , अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर वर्धा वाशिम यवतमाळ या जिल्ह्यांचा समावेश आहे.
advertisement
रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अहिल्यानगर , कोल्हापूर, सोलापूर, छ्त्रपती संभाजीनगर, बीड आणि धाराशिव या जिल्ह्यांना 21 मे साठी पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाकडून जारी करण्यात आला आहे.
राज्यात पावसाचं वातावरण असूनही विदर्भात कमाल तापमान 40 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचल आहे. उन्हाचा पारा आणि पावसाच्या धारा या दोन्हीमुळे वातावरणात दमटपणा निर्माण झालाय. त्यामुळे नागरिकांना चांगलाच उकाडा सहन करावा लागत आहे. तर काही भागांत पावसाच्या आगमनामुळे उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळाला आहे. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणात कमाल तापमान 32 ते 35 अंश सेल्सिअस दरम्यान आहे.
मान्सूनपूर्व पावसामुळे अनेक भागांमध्ये शेतीचे नुकसान झाल्याचे चित्र आहे. काही ठिकाणी वादळी वाऱ्यांमुळे झाडे आणि वीजेच्या तारा कोसळण्याच्या घटना देखील घडल्या आहेत. पुढील काही दिवस राज्यात असेच हवामान राहणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. त्यामुळे नागरिकांना हवामान खात्याच्या सूचना लक्षात घेऊन काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नागरिकांना झाडाखाली उभे राहू नका. वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू असताना घराबाहेर पडू नका. आरोग्याची काळजी घ्या, अशा सूचना वारंवार देण्यात येत आहे.