उष्णतेच्या कडाक्याने लाहीलाही झाल्यानंतर राज्यातील अनेक जिल्ह्यांना पाऊस झोडपणार आहे. कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग मध्ये हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर उत्तर महाराष्ट्रातील जळगाव आणि अहिल्यानगरमध्ये देखील हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली आणि सोलापूर यामध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.
advertisement
तर मराठवाड्यात देखील हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यातील जालना, छत्रपती संभाजीनगर आणि हिंगोली मध्ये हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता असून परभणी, नांदेड, लातूर, धाराशिव, बीड या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
तर विदर्भामध्ये कडाक्याची उष्णता तसेच काही भागांमध्ये पावसाचे आगमन होऊ शकतं. विदर्भातील अकोलाला उष्णतेसाठी अलर्ट दिला आहे व नागपूर, चंद्रपूर, वर्धा आणि गडचिरोली मध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. एकंदरीत राज्याच्या बहुतांश भागांमध्ये उष्ण व दमट हवामान पाहायला मिळणार असून त्याचबरोबर पावसाच्या सरी देखील कोसळू शकतात. मुख्यत्वे सोलापूर, लातूर, धाराशिव, नांदेड या भागामध्ये पावसाची शक्यता अधिक आहे. तर राज्याच्या इतरही जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे.





