सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, बीड आणि हिंगोली जिल्ह्यांत 15 एप्रिलला विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने सांगली, सोलापूर, नांदेड, लातूर, धाराशिव, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यांसाठी 15 एप्रिल रोजी येलो अलर्ट जारी केला आहे. या भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह आणि सोसाट्याच्या वाऱ्यांसह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
advertisement
खतरनाक साप घराच्या आसपासही फिरकणार नाहीत, बचावासाठी लगेच करा 'हे' उपाय; तज्ज्ञ सांगतात...
मुंबईमध्ये 15 एप्रिलला आकाश मुख्यतः निरभ्र राहील. कमाल तापमान 36 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 25 अंश सेल्सिअस असण्याची शक्यता आहे. पुण्यातील कमाल तापमान 39 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 22 अंश सेल्सिअस इतकं असू शकतं. आकाश दिवसभर निरभ्र राहील, मात्र दुपारनंतर किंवा सायंकाळी अंशतः ढगाळ वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे.
छत्रपती संभाजीनगरमधील कमाल तापमान 41 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 25 अंश सेल्सिअस इतकं असू शकतं. 15 एप्रिलला अंशतः ढगाळ आकाश राहून मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. पुढील 24 तासांमध्ये पावसाची स्थिती कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
नाशिकमधील कमाल तापमान 40 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 22 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. 15 एप्रिलला त्याठिकाणी आकाश मुख्यतः निरभ्र राहील. नागपूरमधील कमाल तापमान 41 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 25 अंश सेल्सिअस इतकं असू शकतं. त्याठिकाणी जोरदार वारे, ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता असून, पुढील 24 तासांतही अशीच परिस्थिती राहण्याची शक्यता आहे.
राज्यात सध्या संमिश्र हवामान पाहायला मिळत आहे. अनेक जिल्ह्यांत पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे, तर काही ठिकाणी तापमानात वाढही नोंदवली गेली आहे. त्यामुळे नागरिकांनी उष्णतेपासून आणि दमट हवामानामुळे होणाऱ्या त्रासांपासून स्वतःची काळजी घेणे आवश्यक आहे.





