वाहतूक मार्गात बदलाची गरज का भासली?
हांडेवाडी चौकात दररोज मोठी वाहतूक कोंडी होत असल्याने आणि बायपास मार्गावरील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी वाहतूक विभागाने काही बदल लागू केले आहेत. वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त हिंमत जाधव यांनी सांगितले की, नागरिकांच्या सोयीसाठी हा तात्पुरता बदल करण्यात आला आहे.
कोणत्या दिशेने वळणार वाहने?
नव्या नियमानुसार श्रीराम चौक, जेएसपीएम महाविद्यालय आणि हांडेवाडी चौकातून कात्रज किंवा हडपसर-सासवड रस्त्यावरील मंतरवाडी चौकाकडे जाणाऱ्या वाहनांनी डावीकडे वळावे. कात्रजकडून येणाऱ्या वाहनांनी मंतरवाडीपर्यंत जाऊन जोगेश्वरी मिसळ येथे उजवीकडे वळावे आणि पुढे इच्छित ठिकाणी जावे.
advertisement
श्रीराम चौक, जेएसपीएम महाविद्यालय आणि हांडेवाडी चौकातून होळकरवाडी किंवा कात्रजकडे जाणाऱ्या अवजड वाहनांनीही डावीकडे वळावे. तसेच कात्रजकडून मंतरवाडीकडे जाणाऱ्या अवजड वाहनांनी इंडियन ऑईल पेट्रोल पंपासमोरून उजवीकडे वळावे. तेथून पुढे इच्छित ठिकाणी जाता येईल.
होळकरवाडी आणि मंतरवाडीकडून येणाऱ्या दुचाकी आणि चारचाकी वाहनांनी जेएसपीएम महाविद्यालय, श्रीराम चौक आणि सय्यदनगर मार्गे हडपसरकडे जाण्यासाठी हांडेवाडीकडून कात्रजकडे वळावे. शिवेंद्र हॉटेलसमोरून उजवीकडे वळून पुढे जावे. होळकरवाडी आणि मंतरवाडीकडून येणाऱ्या अवजड वाहनांनी मयूरी वजनकाटा येथून वळावे आणि जेएसपीएम महाविद्यालय, सय्यदनगर मार्गे हडपसरकडे जावे, असे सांगण्यात आले आहे.
वाहतूक शाखेने सांगितले आहे की या तात्पुरत्या बदलामुळे सुरुवातीला थोडा त्रास होऊ शकतो, पुढच्या काही दिवसांत रस्त्यावरची वाहतूक आणखी सुरळीत होईल. नागरिकांनी संयम राखावा, पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे आणि शक्यतो गर्दीच्या वेळेत प्रवास टाळावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
वाहनचालकांना या बदलांबाबत काही सूचना असल्यास, त्या लेखी स्वरूपात वाहतूक शाखा, येरवडा कार्यालय येथे पाठवाव्यात. या बदलांमुळे हांडेवाडी चौकातील कोंडी कमी होऊन प्रवास अधिक सोपा आणि जलद होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
