नेमकी घटना काय?
पेठ येथील किरण कैलास कुंदळे यांचे 'सह्याद्री कृषी उद्योग' नावाचे खत आणि औषधांचे दुकान आहे. अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या सुमारास या दुकानाचे शटर उचकटून आत प्रवेश केला होता. चोरट्यांनी दुकानातील ३ लाख ११ हजार २०५ रुपये किमतीची खते, कीटकनाशके आणि बियाणे चोरून नेली होती. याप्रकरणी मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
advertisement
असा लागला चोरट्यांचा सुगावा: गुन्ह्याचा तपास करत असताना मंचर पोलिसांच्या शोध पथकाला गोपनीय माहिती मिळाली की, काही संशयित एका कारमधून (एमएच १५ डीएम ८१२७) चोरीचा माल घेऊन मंचर ते सुलतानपूर रस्त्यावरील नवीन पुणे-नाशिक हायवेच्या पुलाखाली विक्रीसाठी थांबले आहेत. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून संतोष पोपट नलावडे (वय ३४, रा. नाणेकरवाडी) आणि अमर संतोष नायक (१९, रा. खराबवाडी) यांना ताब्यात घेतले.
पोलिसांनी आरोपींकडून चोरीचे खत, औषधे आणि गुन्ह्यात वापरलेली कार असा एकूण ८ लाख ११ हजार २०५ रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. या कारवाईमुळे कृषी केंद्र चालकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. पोलीस आता या दोघांनी अशाच प्रकारचे आणखी काही गुन्हे केले आहेत का, याचा अधिक तपास करत आहेत.
