अन्न व औषध प्रशासनाच्या विशेष भरारी पथकाने गुरुवारी ही धडक कारवाई केली. ठाणे जिल्ह्यातील नार्कोली येथे ३१ डिसेंबर रोजी दाखल झालेल्या एका गुन्ह्याचा धागा पकडत हे पथक टाकवे बुद्रूक येथील सोएक्स इंडिया कंपनीत पोहोचले होते. या तपासणीत कायद्याने बंदी असलेल्या आणि मानवी आरोग्यास घातक असलेल्या तंबाखूजन्य पदार्थांचा प्रचंड मोठा साठा आढळून आला.
advertisement
या प्रकरणी वडगाव पोलिसांनी कंपनीचा सहाय्यक व्यवस्थापक अनिल कुमार चौहान याला अटक केली असून न्यायालयाने त्याला ८ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. याव्यतिरिक्त कंपनीचे संचालक असिफ फाजलानी आणि फैजल फाजलानी यांच्यासह सोएक्स इंडिया (मुंबई) आणि सोएक्स इंडिया (टाकवे बुद्रुक) या कंपन्यांवरही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
भंडाऱ्याचे सहाय्यक आयुक्त यदुराज दहातोंडे आणि सोलापूरचे अन्न सुरक्षा अधिकारी मंगेश लवटे यांच्या नेतृत्वाखालील विशेष भरारी पथकाने हा छापा टाकला. अन्न सुरक्षा अधिकारी अस्मिता जयंत टोणपे यांनी याप्रकरणी वडगाव पोलीस ठाण्यात अधिकृत फिर्याद दिली आहे. मावळ परिसरात झालेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे.
