बिग ४ अकाउंट फर्मच्या EY कंपनीच्या पुण्यातील एका शाखेत एना सेबेस्टियन पिरेयिल काम करत होती. तिचा मृत्यू झाला आहे. एना केरळची होती. तिच्या मृत्यूनंतर एनाच्या आईने भारतातील कंपनीचे प्रमुख राजीव मेमानी यांना पत्र लिहिलंय. मुलीने कंपनी जॉइन केल्यानंतर ती नेहमीच कामाच्या तणावाखाली रहायची. एनाने मार्च २०२४ मध्ये कंपनी जॉइन केली होती. तिचा मृत्यू 20 जुलै रोजी झाला.
advertisement
एनाच्या आईने म्हटलं की, पहिलीच नोकरी असल्यानं एनाने कामासाठी वाहून घेतलं होतं. कंपनीच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी ती खूप काम करायची. मात्र याचा परिणाम शारीरिक, मानसिक आणि भावनिक आरोग्यावर झाला. कंपनीत जॉइन झाल्यानंतर काही काळातच अस्वस्थ, झोप न येणं, तणावासारख्या समस्या सुरू झाल्या. तरीही ती काम करत होती. तिला वाटायचं की खूप कष्ट, सतत काम करत राहणं हाच यश मिळवण्याचा मार्ग आहे. तरुणीच्या आईने असाही दावा केला की, कामाच्या ताणामुळे अनेक कर्मचाऱ्यांनी राजीनामा दिला. तिचा मॅनेजर क्रिकेट सामन्यावेळी अनेकदा मिटिंग बदलायचा आणि दिवस संपताना काम द्यायचा. यामुळे ताण वाढायचा.
एका घटनेचाही उल्लेख एनाच्या आईने पत्रात केला आहे. एनाच्या बॉसने रात्री एक काम सोपवलं जे सकाळपर्यंत पूर्ण व्हायला हवं होतं. तिला असिस्टंट मॅनेजरने रात्री कॉल केला आणि काम दिलं. दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत पूर्ण व्हायला हवं होतं. त्यामुळे तिला रिकव्हर करण्यासाठी, विश्रांतीसाठी थोडाही वेळ नव्हता. जेव्हा तिने मॅनेजरला अडचण सांगितली तेव्हा तिला उत्तर मिळालं की, तू रात्री काम करू शकतेस, आम्हीही हेच करतो.
एना खूप थकून घरी यायची. अनेकदा कपडे न बदलताच थेट झोपून जायची. तिच्याकडे रिपोर्टसाठी मेसेजेस यायचे. डेडलाइन पूर्ण करण्याचा ते पुरेपूर प्रयत्न करायची. तिला लढायचं माहिती होतं. सहज हार मानायची नाही. आम्ही तिला नोकरी सोडायला सांगितलं पण तिला शिकायचं होतं, नवा अनुभव घ्यायचा होता. पण दबाव तिच्यासाठी खूपच जास्त ठरला असं एनाच्या आईने म्हटलंय.
एनाच्या मृत्यूचं कारण समोर आलेलं नाही. ईमेलमध्ये मृत्यूच्या काही आठवडे आधी तिच्या छातीत दुखत असल्याचं सांगण्यात आलंय. तिला पुण्यातील रुग्णालयात नेण्यात आलं होतं. तिचा ईसीजी नॉर्मल होता. कार्डियोलॉजिस्टनी ती पुरेशी झोप घेत नसल्याचं आणि उशिराने जेवत असल्याचं सांगितलं. तेव्हा गंभीर नसल्याचं वाटलं.